राष्ट्रपती अभिभाषण प्रस्तावावर बोलताना संसदेच्या लोकसभा (Lok Sabha) सभागृहात केलेल्या भाषणातील बराचसा भाग अध्यक्षांच्या आदेशावरुन हटविण्यात आल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. आपण विरोधी पक्षनेता (Leader of Opposition) म्हणून भाषणात जे बोललो ते सत्य होते आणि सत्य कधीही पुसले जाऊ शकत नाही. नरेंद्र मोदी आपल्या राज्यात सत्य हटवू शकतात. पण, ते पुसू शकत नाहीत, असे म्हणत राहुल यांनी हल्ला चढवला आहे.
आरएसएस, भाजपवर जोरदार हल्ला
राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंगळवारी (2 जुलै) सांगितले की, सत्तेच्या जोरावर त्यांना भाषणातील पाहिजे तो मजकूर ते काढू शकतात. पण, त्याने सत्य बदलत नसते. जे सत्य आहे ते असणारच आहे आणि मी संसदेमध्ये सत्यच बोललो आहे. दरम्यान, कनिष्ठ सभागृहात भाषण करताना गांधींनी भाजप आणि आरएसएसवर हिंसा आणि द्वेषाचा प्रचार आणि प्रसार केल्याचा आरोप केला. NEET वाद, अग्निपथ योजना, मणिपूरमधील हिंसाचार आणि अल्पसंख्याकांना होणारी वागणूक यासारख्या मुद्द्यांवरही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. (हेही वाचा, Rahul Gandhi On BJP Over Hinduism: राहुल गांधी आक्रमक; लोकसभेत झळकवले भगवान शिव शंकराचे पोस्टर, हिंदुत्वावरुन भाजपवरही जोरदार टीका)
नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा विरोध
राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह निषेध व्यक्त करण्यासाठी उभे राहिले आणि गांधींच्या टीकेचे खंडन केले. भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस खासदारावर "खोटे बोलणे, सभागृहाची दिशाभूल करणे आणि संपूर्ण हिंदू समुदायाला हिंसक ठरवणे" असा आरोप केला. काँग्रेसने मोदी सरकारवर पलटवार करत प्रत्युत्तर दिले. नरेंद्र मोदी यांनी "संपूर्ण हिंदू समुदायाला हिंसक म्हणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे," असे सांगत गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला. गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांनी सभागृाची माफी मागावी अशी मागणी केली. (हेही वाचा, Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधीदरम्यान राहुल गांधींनी दाखवली संविधानाची प्रत; काँग्रेसकडून व्हिडिओ शेअर(Watch Video))
राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणातील हटविलेल्या भागांमध्ये भाजप अल्पसंख्याकांना अन्यायकारक वागणूक देत असल्याचा आणि हिंसाचार घडवत असल्याचा त्यांचा आरोप होता. याशिवाय, उद्योगपती अदानी आणि अंबानींवरील त्यांची टिप्पणी तसेच अग्निवीर योजनेवरील टीका रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी अतिशय आक्रमक पाहायला मिळाले. त्यांनी आपल्याभाषणात देशातील विविध मुद्द्यांचा उल्लेख करत अक्षरश: भाजप सरकारचे वाभाडे काढले. लोकसभा सभागृहात भाजप प्रथमच इतका आगतिक पाहायला मिळाला. राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांनाही अप्रत्यक्षरित्या टोले लगावले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाल्यापासून राहुल गांधी यांचे हे पहिलेच भाषण होते.