Puri Jagannath Temple Dress Code: पुरीच्या जगन्नाथ मंदिरामध्ये 1 जानेवारीपासून भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; शॉर्ट्स, फाटलेल्या जीन्स, स्कर्टवर बंदी
Jagannath Puri Temple (PC - Wikimedia Commons)

Puri Jagannath Temple Dress Code: पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने (Puri Jagannath Temple) सोमवारी इथल्या 12 व्या शतकातील मंदिरात प्रवेश करू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड (Dress Code) अनिवार्य केला. यासह 2024 च्या नवीन वर्षाच्या दिवसापासून मंदिर परिसरात गुटखा-पान चघळण्यावर आणि प्लास्टिक व पॉलिथिनच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना ‘सभ्य कपडे’ घालणे आवश्यक आहे. हाफ पँट, शॉर्ट्स, फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस ड्रेस परिधान केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिर प्रशासनाने हे नियम जारी करून पोलिसांना त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

नियम लागू झाल्यामुळे 2024 च्या पहिल्या दिवशी मंदिरात येणारे पुरुष भक्त धोतर आणि टॉवेल परिधान केलेले दिसले आणि महिलांनी साडी किंवा सलवार कमीज घातलेले होते. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिराच्या आवारात गुटखा आणि पानावर बंदी लागू करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड आकारण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

भाविकांच्या सुरळीत दर्शनासाठी मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी चोख व्यवस्था केली आहे. मंदिराबाहेर बांधलेली वातानुकूलित टेन्साइल फॅब्रिक रचना सोमवारी सकाळपासून भाविकांसाठी कार्यान्वित करण्यात आली. संरचनेत पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक स्वच्छतागृहे यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सार्वजनिक घोषणा यंत्रणा देखील सुसज्ज आहेत. भाविकांना बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. (हेही वाचा: Ayodhya Surya Stambh Viral Video: राम नगरी अयोध्या सजणार सूर्यस्तभांनी, तीस फूट उंचीचे खांब शहराच्या मुख्य रस्त्यावर)

दरम्यान, ओडिशामध्ये, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे सरकार जगन्नाथ पुरी धामचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन हेरिटेज कॉरिडॉर विकसित करण्यावर विशेष भर देत आहे. सीएम पटनायक यांचे निकटवर्तीय व्हीके पांडियन या प्रकल्पावर बारीक लक्ष ठेवून आहेत. दरवर्षी लाखो भाविक पुरीला भेट देत असताना, जगन्नाथ पुरी मंदिरात प्रभावी रांग व्यवस्थापनावरही सरकार लक्ष केंद्रित करत आहे. श्री जगन्नाथ मंदिर हेरिटेज कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन 17 जानेवारी रोजी पुरीमध्ये होणार आहे.