Puri Jagannath Temple: ओडिशाच्या जगन्नाथ पुरी मंदिरामध्ये कोरोना विषाणूचा हाहाकार; तब्बल 351 सेवक व 53 कर्मचाऱ्यांना Covid-19 ची लागण
Jagannath Puri Rath Yatra (Photo credits: Twitter/Naveen Jindal)

सध्याच्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) काळात लॉक डाऊनमध्ये अनेक गोष्टींमध्ये शिथिलता आणली गेली आहे. मात्र अजूनही धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबत सरकार साशंक आहे. देशातील धार्मिक स्थळे सुरु करण्याची मागणी जवळजवळ प्रत्येक राज्यातून होत आहे. अशात ओडिशाच्या (Odisha) पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिरात (Lord Jagannath Temple) कोरोना व्हायरसच्या उद्रेकाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंदिरातील 400 हून अधिक पुजारी व अधिकाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मंदिरातील 315 सेवक आणि 53 कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे.

श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे प्रशासक अजय जेना म्हणाले की, बाराव्या शतकातील या मंदिराच्या सेवेमध्ये गुंतलेल्या एकूण 404 जणांची कोरोना विषाणूची सकारात्मक चाचणी आली आहे. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर सेवादार नसतानाही भगवान जगन्नाथची पूजा आणि त्यासंबंधित सर्व विधी सामान्यपणे चालू आहेत. श्रीमंदिरामधील सेवकांना कोरोना संक्रमणापासून वाचवण्यासाठी प्रशासनाने मोहीम हाती घेतली असून, यासाठी पुरी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

कोरोनाची लागण झाल्यानंतर, ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना उपचार देण्यासाठी सहाय्यक महसूल अधिकारी यांच्या नेतृत्वात दोन पथके तयार केली गेली आहेत. त्याचप्रमाणे व्हेंटिलेटर व मास्क परिधान करून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय श्री मंदिराच्या आवारात पान खाऊन थुंकणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सेवकांनी पान खाऊन मंदिरात प्रवेश केल्यास, प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या कर्मचार्‍यांना शिक्षा होणार आहे.

पुरी जगन्नाथ मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथले अनुष्ठान एकमेकांशी जोडलेले आहेत. जगन्नाथ संस्कृती संशोधक भास्कर मिश्रा म्हणाले की, जर एखादी विधी केली गेली नाही तर मंदिरातील परंपरेनुसार दुसरा अनुष्ठान करता येणार नाही. त्यामुळे जर येत्या काळात संक्रमितांची संख्या वाढत गेली तर पुढे समस्या उद्भवू शकतात. (हेही वाचा: भारतात मागील 11 दिवसांत 10 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात- आरोग्य मंत्रालय)

कोरोनाच्या साथीमुळे जगन्नाथ मंदिर मार्चपासून भाविकांसाठी बंद आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनाची लागण झालेले बहुतेक लोक घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. सध्या मंदिरामध्ये विधीसाठी अनुभवी आणि जाणकार लोकांची कमतरता आहे. देवाच्या पूजे–अर्चेसाठी कमीतकमी 13 पुजार्‍यांच्या ची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि सुभद्रा देवीच्या पूजेसाठी इतर सेवादारांशिवाय 39 पुजार्‍यांची उपस्थिती आवश्यक आहे.