छे..! मोदींनी कधीच चहा विकला नाही, हा तर केवळ पब्लिसिटी स्टंट: प्रविण तोगडीया
Praveen Togadia says Prime Minister never sold tea it was just a gimmick | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Praveen Togadia on Pm Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी चहा विकला असे सांगणे म्हणजे केवळ पब्लिसिटी स्टंट आहे. पंतप्रधान मोदी यांना मी तब्बल 43 वर्षांपासून ओळखतो. या काळात मी त्यांना चहा विकताना कधीच पाहिले नाही, असा दावा विश्व हिंदू परिषदेचे (VHP) माजी प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी खरोखरच चाहा विकला का? याबाबत अनेकदा शंका उपस्थित केली जाते. त्यात तोगडीया यांनी असा दावा केल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महत्त्वाचे असे की, प्रविण तोगडी आणि पंतप्रप्रधान मोदी हे दोघेही प्रदीर्घ काळ एकमेकांची मित्र राहिले आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना तोगडिया यांनी सांगितले की, मी डॉक्टरी केली आहे. जर तुम्हाला शंका येत असेल तर, मला ओळखणाऱ्या दोस्त, नातेवाईक किंवा मी डॉक्टरी केलेल्या परिसरात कुणालाही तुम्ही विचारु शकता. तसे पुरावेही मिळू शकतात. पण, नरेंद्र मोदी यांनी चहा विकला असा पुरावा कोणीही देऊ शकत नाही. दरम्यान, प्रविण तोगडीया यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यास सुरुवात केली आहे. याच मुद्द्यावरुन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पत्रावरही जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

पुढे बोलताना तोगडीया यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन स्पष्ट होते की, पुढच्या पाच वर्षांतही राम मंदिर उभा राहू शकत नाही. भाजप आणि आरएसएस या दोन्ही संघटनांनी देशाला आणि जनतेला अंधारात ठेवले आहे. मात्र, आता हिंदू जागा झाला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर येत्या 9 फेब्रुवारीला आपण नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचेही तोगडीया यांनी सांगितले. त्यांचा पक्ष सत्तेत आल्यास संसदेत राम मंदिरासाठी कायदा करु असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. (हेही वाचा, www.corruptmodi.com भाजप, मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून 'डिजिटल हल्ला')

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीका करताना तोगडीया म्हणाले, पंतप्रधान मोदी हे जर तीन तलाकसाठी मध्यरात्री कायदा करु शकतात तर, राम मंदिरासाठी असे का होऊ शकत नाही. पंतप्रधान मोदी यांना दुसऱ्यांदा जरी पंतप्रधान बनवले तरीसुद्धा ते राम मंदिर उभारु शकत नाहीत, असेही तोगडीया म्हणाले. 2019मध्ये निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर, नरेंद्र मोदी पुन्हा गुजरातला परत जातील तर, भैय्याजी जोशी हेसुद्धा नागपूरला परततील, असेही तोगडीया यांनी सांगितले.