Pranab Mukherjee Funeral: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यावर दिल्लीत दुपारी 2 च्या सुमारास अंत्यसंस्कार
Pranab Mukherjee Funeral| Photo Credits: Twitter/ ANI

भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांचे काल (31 ऑगस्ट) निधन झाले आहे. दिल्लीच्या आर्मी रूग्णालयामध्ये 21 दिवस सुरू असलेली त्यांची आजारपणाशी असलेली झुंज अखेर काल संपली. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी R&R Hospital मध्ये अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी लोधी स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. थोड्याच वेळापूर्वी दिल्ली मध्ये त्यांचे पार्थिव शरीर राहत्या घरी आणण्यात आले आहे. दुपारी 2 च्या सुमारास त्यांना अंतिम निरोप दिला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. Former President Pranab Mukherjee Passes Away: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी व्यक्त केला शोक

भारताचे 13 वे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्येच मेंदूत गाठ झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र या गुंतागुंतीत त्यांची तब्येत खालावली. ते कोमामध्ये गेले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले होते. व्हेंटिलेटरवर असलेल्या प्रणब मुखर्जी यांची अखेर काल संध्याकाळी प्राणज्योत मालवली.

प्रणब मुखर्जी यांच्या निधनाचं वृत्त समजताच राजकीय, सामाजिक, शिक्षण, कला क्षेत्रातील नामवंतांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली होती. तसेच 7 दिवसांचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आला आहे. आज सकाळपासूनच प्रणब मुखर्जींना आदरांजली अर्पण करण्यासाठी तिन्ही दलाचे प्रमुख, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सह अनेक मान्यवर उपस्थित होते.