Prafulla Patel | Twitter

YB Chavan Centre: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडखोर असलेल्या अजित पवार गटाने आज पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांची वायबी सेंटर येथे भेट घेतली. या भेटीनंतर बंडखोर गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आज आम्ही पुन्हा एकदा साहेबांची (शरद पवार) भेट घेतली. काल काही मोजकेच आमदार साहेबांच्या भेटीसाठी येऊ शकले होते. त्यामुळे आज आम्ही सर्व आमदार मिळून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. आजही त्यांनी आमचे म्हणने ऐकून घेतले. मात्र, कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शरद पवार यांच्या मनातील कसं सांगू शकतो? असा सवालही पटेल यांनी या वेळी माध्यमांना केला.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील अनेक आमदारांची शरद पवार यांना भेटण्याची इच्छा होती. त्यांचे त्यांना आशीर्वादही घ्यायचे होते. त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या भेटीसाठी आलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध राहील यासाठी आम्ही सर्वांनी आजही पवार साहेबांना विनंती केली. राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या, असेही आम्ही साहेबांना सांगितल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. (हेही वाचा, NCP Crisis: शरद पवार यांच्या भेटीसाठी Ajit Pawar समर्थक आमदारांसह पुन्हा वायबी सेंटरला; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं चाललंय तरी काय?)

व्हिडिओ

अजित पवार समर्थक आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, तत्पूर्वी शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी जवळपास 45 मिनीटे चर्चा केली. या चर्चेनंतर हे आमदार शरद पवार यांना भेटले. त्यामुळे शरद पावर यांच्या मनात नेमके काय आहे आणि अजित पवार गटाला काय हवे आहे याबाबत अद्याप तरी तपशील बाहेर आला नाही. दुसऱ्या बाजूला अशीही चर्चा आहे की, शरद पवार यांनी सोबत यावे यासाठी अजित पवार गट आग्रही आहे. मात्र, त्याला पावारांनी कोणत्याही प्रकारची अनुकुलता दाखवली नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा सर्व आमदारांना सोबत घेऊन शरद पवार यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जातो आहे.