पीएनबी घोटाळा: सक्तवसुली संचलनालयाचा नीरव मोदीला दुबईतही धक्का; ५७ कोटी रुपयांच्या ११ मालमत्ता जप्त
नीरव मोदी (FILE IMAGE)

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लाऊन देशाबाहेर पळालेला घोटाळेबाज नीरव मोदीला भारतीय तपास संस्थांनी चांगलाच दणका दिला आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ED) दुबई येथील नीरव मोदीच्या ११ मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांची एकूण रक्कम सुमारे ५६.८ कोटी रुपये असल्याचे समजते. मनीलॉन्ड्रींग विरोधी कायद्यानसार ईडीने ही कारवाई केली. महत्त्वाचे असे की, जप्त केलेल्या संपत्तीमध्ये नीरव मोदी ग्रुपची कंपनी असलेल्या फायरस्टार डायमंड एफजेडईच्या मालमत्तेचाही समावेश आहे. पीएनबी घोटाळा पुढे येताच नीरव मोदी देशाबाहेर फरार झाला आहे. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी बनावट कागदपत्रांच्या अधारे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बँकांकडून घेतले आहे. पण, हा घोटाळा उघड होणार हे ध्यानात येताच नीरव मोदीने देशाबाहेर पळ काढला.

पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटी रुपयांचा घोटाळा पुढे येण्याआधीच काही काळ नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी देशाबाहेर पळ काढला होता. मोदी-चोक्सी यांनी मुंबईतील येथील बँकेच्या काही कर्मचारी, अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या अधारे प्रचंड मोठ्या रकमांची कर्जे घेतली. पंजाब नॅशनल बँकेकडे असलेल्या या कर्जाचा आकडा १३, हजार कोटी रुपये असल्याचे प्रसारमाध्यमे सांगतात. बँकींग क्षेत्रातील हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा असाही या घोटळ्याचा लौकीक आहे. हा घोटाळा उघड होताच सीबीआय सोबतच ईडीनेही या प्रकरणाची चौकशी सुरु केली.

दरम्यान, देशाबाहेर पळालेल्या निरव मोदी आणि मेहुल चोक्सी या जोडगोळीपैकी चोक्सीने विदेशातील नागरिकत्वही मिळवले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नीरव मोदीनेही विदेशात नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्याला यश मिळू शकले नाही. ईडीने पीएनबीला चुना लाऊन पसार होणाऱ्या मोदीविरोधात कारवाई करण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. पण, मोदीची केवळ मालमत्ता जप्त करुन आणि त्याची विक्री करुन कर्जाची भरपाई करणे हे तपास यंत्रणांसाठी सोपे नाही. आतापर्यंत तपासयंत्रणांनी मोदीची हजारो, कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पीएनबीतील घोटाळा पुढे अल्यानंतर देशातून अशा प्रकारचे अनेक घोटाळे पुढे आलेआहेत. ज्यांचा संबंध बँकींग घोटाळ्यांशी थेट जोडला जातो.

दरम्यान, पीएनबी घोटाळा उघडझाल्यानंतर त्यावरुन राजकारणही चांगलेच तापले. काँग्रेसने या घोटाळ्याचे खापर विद्यमान भाजप सरकारवर फोडले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर या घोटाळ्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जबाबदार धरले. विशेष असे की, दावोस (स्वित्स्झर्लंड) येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या शिखर परिषदेत भारतीय व्यवसायिकांचे मंडळ सहभागी झाले होते. यात नीरव मोदीचाही एक उद्योजक म्हणून समावेश होता. तसेच, त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटोही काढला होता. हा फोटो प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होताच काँग्रेसने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.