PM Modi (PC - ANI)

कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान (Pakistani) आणि भारत यांच्यातील तणावपूर्ण राजनैतिक संबंधांमध्ये अलीकडच्या काही वर्षांत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. अशात आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडहून नवी दिल्लीला परतताना पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर केला. हवाई वाहतूक संबंधित सूत्रांनी शनिवारी पाकिस्तानी मीडिया संस्था जिओ न्यूजला ही माहिती दिली. पाकिस्तान नागरी उड्डाण प्राधिकरण (PCCA) शी संबंधित सूत्रांनी उघड केले की, पोलंडहून नवी दिल्लीला परतत असताना भारतीय पंतप्रधान मोदींना घेऊन जाणारे विमान पाकिस्तानी हवाई हद्दीतून गेले.

पाकिस्तान नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान सकाळी 10:15 वाजता पाकिस्तानी हवाई हद्दीत दाखल झाले आणि 46 मिनिटे पाकिस्तानी हवाई हद्दीत घालवल्यानंतर, सकाळी 11:01 वाजता परतले. सूत्रांनी सांगितले की, युक्रेनची राजधानी कीव येथे जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडची राजधानी वॉर्सा येथे गेले होते. कीवमध्ये त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली.

याआधी 26 फेब्रुवारी 2019 रोजी बालाकोटमध्ये हवाई हल्ला झाला. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द पूर्णपणे बंद केली. मार्चमध्ये पाकिस्तानने हवाई क्षेत्र अंशत: उघडले पण भारतीय उड्डाणांसाठी ते मर्यादित ठेवले. 2019 मध्ये भारताने पंतप्रधान मोदींच्या विमानासाठी पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्याची परवानगी मागितली होती. मात्र काश्मीर वादामुळे ते पाकिस्तानने फेटाळले होते. पंतप्रधान मोदींच्या विमानाला जर्मनीला जाण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीची गरज होती. (हेही वाचा: Ladakh Five New District: लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची निर्मीती; विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय)

मात्र दोन वर्षांनंतर, पाकिस्तानने भारतीय पंतप्रधानांच्या नॉन-स्टॉप फ्लाइटला अमेरिकेच्या हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी दिली. आता पीएम मोदींचे विमान 46 मिनिटे पाकिस्तान हद्दीमध्ये होते. पाकिस्तानच्या आघाडीच्या वृत्तपत्र डॉनने आपल्या वृत्तात लिहिले आहे की, भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जात असताना सदिच्छा संदेश देण्याची परंपरा पाळली नाही, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणावाच्या चर्चांना उधाण आले आहे. डॉनने विमान वाहतूक उद्योगातील एका सूत्राचा हवाला देत सांगितले की, सदिच्छा संदेश पाठवणे ही एक परंपरा आहे, सक्ती नाही. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान मोदी पोलंडची राजधानी वॉर्सा येथे गेले होते. युद्धामुळे, विमानाने जाण्याऐवजी, ते पोलंडमधील वॉर्सॉला गेले, तेथून ते ट्रेनने कीवला पोहोचले.