पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मुंबई, कोलकाता व नोएडा येथे 3 हाय-टेक कोरोना व्हायरस लॅबचे उद्घाटन; 'Coronavirus शी लढण्यासाठी भारत इतरांपेक्षा उत्तम स्थितीत आहे'
PM Narendra Modi Launches COVID-19 Testing Facilities in 3 Cities (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी मुंबई (Mumbai), कोलकाता (Kolkata) आणि नोएडा (Noida) या तीन शहरांमध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus) टेस्टिंगसाठी तीन हाय-टेक लॅबचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, देशातील कोट्यवधी नागरिक अत्यंत धैर्याने कोरोनाशी लढत आहेत. हाय टेक्निक स्टेट ऑफ आर्ट टेस्टिंग सुविधा आजपासून सुरू झाली आहे, ज्यामुळे पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाविरूद्धच्या लढ्यात अधिक बळकटी मिळणार आहे.

पीएम मोदी पुढे म्हणाले, 'दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि कोलकाता ही आर्थिक बाबींसाठी मोठी केंद्रे आहेत. येथे देशातील लाखो तरुण आपले करियर, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात. आता या तीन ठिकाणी चाचणीची जी उपलब्धता आहे, त्यामध्ये 10 हजार चाचण्यांच्या क्षमतेद्वारे भर घातली जाईल. या हायटेक लॅब केवळ कोरोना चाचणीपुरत्याच मर्यादीत नाहीत. भविष्यात, या प्रयोगशाळांमध्ये हिपॅटायटीस बी आणि सी, एचआयव्ही, डेंग्यू यासह अनेक आजारांच्या तपासणीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. अशाप्रकारे कोविडशी लढताना पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशला या चाचणी प्रयोगशाळांचा फायदा होईल.' (हेही वाचा: देशात कोरोना व्हायरस रिपोर्टिंगच्या बाबतीत उत्तर प्रदेश व बिहारची सर्वात वाईट कामगिरी, कर्नाटकाचे Covid-19 Reporting सर्वात चांगले)

एएनआय ट्वीट -

 

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 'कोरोना विरूद्धच्या या मोठ्या आणि दीर्घ लढ्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे, देशात वेगाने कोरोनानुसार आरोग्यविषयक पायाभूत सुविधा निर्माण करणे. यासाठीच केंद्र सरकारने अगदी सुरुवातीलाच 15 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते.  कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये भारत ज्या प्रकारे वेगाने काम करत आहे, त्याबाबत पीएम म्हणाले, 'कोविड स्पेशल हॉस्पिटल, टेस्टिंग, ट्रेसिंग व ट्रॅकिंगची नेटवर्क अशा प्रकारे भारताने आपल्या क्षमतांचा वेगाने विस्तार केला.

आज भारतात 11 हजाराहून अधिक कोविड सुविधा आहेत, 11 लाखांहून अधिक आयसोलेशन बेड्स आहेत. जानेवारीत जिथे आमच्याकडे कोरोना टेस्टचे एकच केंद्र होते, तिथे आज जवळपास 1300 लॅब कार्यरत आहेत. आज भारतात दररोज 5 लाखाहून अधिक चाचण्या घेतल्या जातात. येत्या आठवड्यात, त्या दररोज 10 लाख करण्याचा प्रयत्न केला जात आहे.