पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 21 ऑगस्टपासून दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदी यूक्रेनचा (Narendra Modi Ukraine Tour) दौरा देखील करणार आहेत. मोदींचा यावेळचा विदेश दौरा पोलंड आणि यूक्रेन या दोन देशांमध्ये असेल. नरेंद्र मोदी प्रथम पोलंडनंतर यूक्रेनच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत पुष्टी केली आहे. दरम्यान नरेंद्र मोदी यूक्रेनचा दौरा करत असल्यानं रशिया काय भूमिका घेणार हे देखील पाहावं लागणार आहे. (हेही वाचा - PM Modi Returns India: रशिया आणि ऑस्ट्रियाचा दौरा संपवून पंतप्रधान मोदी भारतात परतले; पाहा व्हिडिओ)
रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु झाल्यानंतर भारतानं दोन्ही देशांनी युद्धाचा मार्ग वापरण्याऐवजी सांमजस्यानं अन् चर्चेनं विषय सोडवावा अशी भूमिका घेतली होती. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचा दौरा केला होता. आता नरेंद्र मोदी पोलंड आणि यूक्रेनचा दौरा करणार आहेत. पोलंड आणि यूक्रेनच्या राष्ट्रप्रमुखांनी दिलेल्या आमंत्रणानंतर नरेंद्र मोदी या देशांचा दौरा करणार आहेत. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदीमीर झेलेंस्की यांनी मोदींना आमंत्रण दिलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिलाच युक्रेन दौरा असल्यानं जगभरातील नेत्यांचं मोदींच्या दौऱ्याकडे लक्ष असेल. पंतप्रधान मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर जातील तत्पूर्वी ते 21 आणि 22 ऑगस्टला पंतप्रधान पोलंड देशाचा दौरा करणार आहेत. रशियानं फेब्रुवारी 2022 मध्ये यूक्रेनवर आक्रमकण केलं होतं. यूक्रेनला नाटोचं सदस्यपद देण्यात येऊ नये यासाठी रशियानं आक्रमक भूमिका घेतली होती.