भारतात अद्याप कोरोना व्हायरसचा Community Transmission नाही- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती
Health Minister Dr. Harsh Vardhan | (Photo Credits: ANI)

भारतात अद्याप  कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सामुदायिक संसर्ग (Community Transmission) नाही असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Harsh Vardhan) यांनी गुरुवारी (9 जुलै) सांगितले. देशभरातील कोविड-19 वाढत्या रुग्णसंख्येवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. तज्ञांच्या मतानुसार भारतात अद्याप कम्युनिटी स्प्रेड झालेला नाही, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. देशात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे पण कम्युनिटी ट्रान्समिशन कुठेच नाही, असे हर्षवर्धन यांनी सांगितले. (महाराष्ट्र: कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीच्या उपचाराला यश, आतापर्यंत 93 हजार जणांची प्रकृती सुधारली- आरोग्यमंत्री राजेश टोपे)

भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 7.5 लाखांच्या पार गेला आहे. त्यामुळे देशातील कोविड-19 च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी Group of Ministers (GoM) ची बैठक बोलवण्यात आली होती. देशात दिवसागणित कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. मागील 24 तासांत ही 24,879 नव्या रुग्णांची मोठी भर पडली. तर 487 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या 7,67,296 इतकी झाली असून एकूण  21,129 रुग्ण कोरोना संसर्गामुळे दगावले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

ANI Tweet:

दरम्यान देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या चांगली असल्याने रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत आहे. सध्याच्या रिकव्हरी रेट 61.53% इतका आहे. कारण देशातील अॅक्टीव्ह केसेस 2,69,789 इतक्या असून 4,76,377 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. म्हणजेच अॅक्टीव्ह केसेसपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसंच देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत प्रथमस्थानी असलेल्या महाराष्ट्रातही कम्युनिटी स्प्रेड नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. ही समाधानकारक बाब असली तरी सरकार, आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.