NITI Aayog office (Photo Credits: ANI)

जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोनाच्या परिस्थितीत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचसोबत सरकार कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. याच दरम्यान आता नीति आयोग (NITI Aayog) मधील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे इमारत 48 तासांसाठी सील करण्यात आली आहे. एक दिवस आधीच सुप्रीम कोर्टातील (Supreme Court)  एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन कुलसचिवांना क्वारंटाइन करण्यात आले. त्यानंतर आता या कुलसचिवांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे.

नीति आयोगाचे उपसचिव अजीत कुमार यांनी असे सांगितले आहे की, नीती आयोगाच्या एका अधिकाऱ्याला कोरोना झाल्याची पुष्टी करण्यात आली. त्यानंतर नीति आयोगाची इमारत सॅनिटाइज करत पुढील दोन दिवसांसाठी सील करण्यात आली आहे. त्याचसोबत आवश्यक त्या प्रोटोकॉलचे पालन सुद्धा केले जात आहे.(Coronavirus च्या उपचारांमध्ये सामील नसलेल्या 2 डॉक्टरांसह, 33 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण)

राजधानी दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजारांच्या पार गेला आहे. तरीही दिल्लीचे आरोग्य मंत्री यांनी असा दावा केला आहे की, कोरोनाची दुप्पट वाढणारी संख्या ही अन्य देशांपेक्षा फार कमी आहे. त्यांनी असे ही म्हटले आहे की, दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पटीने वाढण्याचा आकडा 13 दिवसांचा आहे. पण देशाचा हाच आकडा 9.1 दिवस आहे. दिल्लीत सोमवारी कोरोना व्हायरसचे 190 प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3108 वर पोहचला आहे.