Coronavirus in India (Photo Credits: PTI)

राजधानी दिल्लीतील (New Delhi) पटपडगंज (Patparganj) परिसरातील मॅक्स हॉस्पिटलमध्ये (Max Hospital) एका डॉक्टरसह 33 जणांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. रुग्णालय प्रशासनाने संपूर्ण वैद्यकीय कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता, यानंतर आतापर्यंत 33 आरोग्यसेवा कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. संक्रमित वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सर्व सदस्यांना साकेतच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. महत्वाचे म्हणजे  पटपडगंजमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये कोरोना विषाणूवर उपचार केला जात नाही, तसेच येथील कर्मचारी कोरोना विषाणू उपचारातमध्येही समाविष्ट नाहीत, तरी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

400 हून अधिक बेड्सची सुविधा असलेले हे रुग्णालय जिल्ह्यातील एक प्रमुख रुग्णालय आहे. रुग्णालयाने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरूवातीपासूनच रुग्णालयाने वेळोवेळी रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी आणि दाखल रूग्णांची कोरोना व्हायरसची चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याच चाचणीत, 33 आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. यामध्ये 2 डॉक्टर आणि 23 नर्सिंग स्टाफ आणि इतर तंत्रज्ञ आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे. या सर्वांना मॅक्स साकेतच्या कोरोना व्हायरस विभागात हलविण्यात आले आहे.

(हेही वाचा: Lockdown Extension: 3 मे नंतर सुद्धा वाढणार लॉक डाऊन? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्र्यांनी केल्या 'या' सूचना)

यासह रुग्णालयाने मॅक्स पटपड़गंजच्या 145 परिचारिकांना 14 दिवस एका हॉस्टेलमध्ये वेगळे ठेवले आहे. मॅक्स ग्रुपने 15 एप्रिल रोजी जाहीर केले की, येत्या काही आठवड्यांत देशभरात 24,000 आरोग्य कर्मचारी आणि 1,000  रुग्णांची कोरोना चाचणी केली जाईल. दरम्यान, दिल्लीच्या 14 रुग्णालयांमधील 100 हून अधिक डॉक्टर आणि नर्स आणि इतर 14 आरोग्य कर्मचारी कोरोना विषाणू संसर्गाचा बळी ठरले आहेत. रविवारी एम्स आणि सफदरजंग यांच्यासह पाच रुग्णालयात 14 आरोग्य कर्मचारी संक्रमित असल्याचे आढळले. दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय राजधानीत कोरोना विषाणूची 293 प्रकरणे नोंदवली गेली आणि त्यानंतर संक्रमणाचे एकूण प्रमाण 2,918 वर गेले आहे.