COVID-19 Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा NIDM कडून इशारा; लहान मुलांसाठी धोक्याची शक्यता
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका कायम आहे. कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेसंबंधी अनेक स्टडीज समोर आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या तिसरी लाट भयंकर रुप धारण करु नये, यासाठी केंद्र सरकारचेही प्रयत्न सुरु आहेत. याचदरम्यान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या तज्ञ समितीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरच्या महिन्याच्या जवळपास उच्चांक गाठेल, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

टाईम्स ऑफ इंडिया च्या रिपोर्टनुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बाधित मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तर बाल चिकित्सा सुविधा- डॉक्टर, कर्मचारी, व्हेंटिलेटर, अॅम्बुलन्स इत्यादी कोणतीही उपकरणं सध्या उपलब्ध नाहीत. या संदर्भातील रिपोर्ट पीएमओकडे सोपवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर NIDM ने मुलांसाठी चांगल्या आरोग्य सुविधांची मागणी केली आहे. तसंच कोमोरबिडिटी असलेल्या मुलांना लसीकरणासाठी प्राधान्य द्या आणि दिव्यांग लोकांवर विशेष लक्ष द्या, असेही सांगण्यात आले आहे. (Covid-19 Third Wave: देशात ऑगस्ट महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट; ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या शिगेला- Reports)

कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्याच्या आसपास उच्चांक गाठेल. त्यादरम्यान नवा वेरिएंट समोर न आल्यास कोरोनाची तिसरी लाट फार भयंकर नसेल, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. परंतु, ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असेल, असे अनेक रिपोर्ट्समधून समोर आले आहे.

दरम्यान, कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नसल्याने कोरोना नियमांचे पालन करा. मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टसिंगचे पालन ही त्रिसुत्री सांभाळणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लस जरुर घ्या, असेही आवाहन करण्यात आले आहे.