CBSE अभ्यासक्रमामधून काही विषय काढून टाकल्याने नवा वाद; HRD मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी दिली प्रतिक्रिया- 'शिक्षणापासून राजकारण दूर ठेवा'
Ramesh Pokhriyal (Photo Credits-Twitter)

काल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education) ने एक महत्वाचा निर्णय घेत, 9 वी ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात सुमारे 30 टक्के कपात केली. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी रास्त आहे, मात्र यामुळे आता नवीन राजकारण सुरु झाले आहे. पुढील वर्षी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, नागरिकत्व, नोटबंदी आणि लोकशाही हक्कांविषयी अभ्यास करण्याची गरज भासणार नाही, कारण हे विषय या अभ्यासक्रमातून वगळले आहेत. मात्र आता इतके महत्वाचे विषय मुद्दाम काढून टाकले असा आरोप होत आहे.

त्यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास (HRD) मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल (Dr Ramesh Pokhriyal) यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सीबीएसई अभ्यासक्रमामधून काही विषय काढून टाकण्याबाबत, मुद्दाम मतभेद निर्माण केले जात आहेत. ते म्हणाले, 'मुलांना शिक्षण देण्याचे आमचे समर्पित कार्य आहे. माझी ही नम्र विनंती आहे की, आपण राजकारणापासून शिक्षण वेगळे ठवले पाहिजे.’ गुरुवारी रमेश पोखरियाल निशंक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या संदर्भात अनेक ट्विट केले.

ते म्हणाले, 'जसे सीबीएसईने स्पष्टीकरण दिले आहे की, शाळांना एनसीईआरटी (NCERT) पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका (Alternate Academic Calendar) अनुसरण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नमूद केलेले सर्व विषय एकाच शैक्षणिक वर्षात समाविष्ट आहेत. या निर्णयामागील एकमेव उद्देश म्हणजे अभ्यासक्रमात 30% कपात करून विद्यार्थ्यांवरील ताण कमी करणे हा आहे. हा निर्णय विविध तज्ञांच्या सल्ल्यानुसार व शैक्षणिक संस्थांकडून आलेल्या सूचनांनंतर घेण्यात आला आहे.’ तसेच सीबीएसईने या निर्णय 2020-2021 शैक्षणिक सत्रासाठी घेण्यात आल्या असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 9 ते 12 पर्यंतच्या अभ्यासक्रमात 30% कपात)

पुढे हे देखील सांगण्यात आले आहे की, अभ्यासक्रमातून काढले गेलेले विषय पूर्वी शाळांमध्ये लागू असलेल्या वैकल्पिक शैक्षणिक वर्षात, लॉकडाऊन अंतर्गत शिकवले गेले होते. सीबीएसईने म्हटले आहे की 2021 बोर्डाच्या परीक्षांमध्ये ज्या विषयांचा अभ्यासक्रम काढून घेण्यात आला आहे, त्याबाबत प्रश्न विचारले जाणार नाहीत.