Injection | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

सध्याच्या कोरोना विषाणू महामारीमध्ये डॉक्टर व रुग्णालये जनतेसाठी अहोरात्र काम करीत आहेत. मात्र काही ठिकाणी डॉक्टरांच्या निष्काळजीपणाच्याही घटना समोर आल्या आहेत. गुरुग्राममधील (Gurugram) डुंडाहेडा गावात खासगी रूग्णालयात 34 वर्षांच्या महिला रूग्णाला अँटीबायोटिक इंजेक्शन (Antibiotic Injection) दिल्यानंतर, तिचा डावा हात पूर्णपणे काळा पडला आहे. 23 एप्रिल रोजी गर्भपात झाल्यानंतर महिलेला हे इंजेक्शन देण्यात आले होते. या महिलेच्या पतीने रुग्णालयाविरोधात जिल्हा आरोग्य विभागाकडे निष्काळजीपणाची तक्रार दाखल केली आहे.

ही महिला विनिता पती सरफराजसह गुरुग्रामच्या चक्करपूर गावात राहत आहे. सरफराजने आरोप केला आहे की, 23 एप्रिल रोजी तो आपल्या पत्नीला घेऊन गुरूग्रामच्या डुंडाहेडा येथील पार्क हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यासाठी घेऊन आला होता. सरफराज म्हणाला की, 'गर्भपात झाल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी माझ्या पत्नीला अँटीबायोटिक इंजेक्शन दिले, ज्यामुळे तिच्या शरीरात रिअॅक्शन झाली. डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की ही रिअॅक्शन पसरत आहे, म्हणून हात कापावा लागेल.' सरफराज पुढे म्हणाला की, यामध्ये रुग्णालयाचा निष्काळजीपणा असूनही आता ते ऑपरेशनसाठी आमच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत आहेत. (हेही वाचा: खासगी रुग्णालयाचा खोटारडेपणा उघड, 92 Covid-19 रुग्णांना द्यावे लागणार 10 लाख रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण)

सरफराजने घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली की, ‘23 एप्रिल रोजी पत्नीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याच दिवशी तिला डिस्चार्ज देण्यात आला. तेव्हापासून तिचे दुखणे वाढले व दुसर्‍या दिवशी 24 एप्रिल रोजी आम्ही पुन्हा दवाखान्यात गेलो. त्यावेळी डॉक्टरांनी तिचे औषध बदलले. 25 एप्रिल रोजी हातांचा अल्ट्रासाऊंड करण्यात आला आणि नंतर आम्हाला दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात पाठविण्यात आले. आरएमएल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले की अँटीबायोटिक इंजेक्शनच्या रिअॅक्शनमुळे इन्फेक्शन वाढले आहे. हाताचे ऑपरेशन 6-8 तासांमध्ये झाले असते तर कदाचित हात वाचला असता. मात्र आता 4 दिवस उलटून गेल्यामुळे हात कापावा लागेल.’

कोरोनामुळे सरफराज बेरोजगार आहे व सध्या त्याची पत्नीच कमावत आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फार हलाखीची आहे. काही दिवसांपूर्वी एका स्वयंसेवी संस्थेने कुटुंबाला काही खाद्यपदार्थ पुरवले होते. आपल्याकडे आता पत्नीच्या ऑपरेशनसाठी पैसे नसल्याचेही सरफराजने सांगितले. दरम्यान, गुरुग्रामचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वीरेंद्र यादव यांनी आयएएनएसला सांगितले की, आरोग्य विभागाला या प्रकरणाबाबत कोणतीही तक्रार मिळालेली नाही. याबाबत माहिती कळताच रुग्णालयाविरूद्ध कारवाई सुरू केली जाईल. रुग्णालय व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.