Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

नोटबंदीच्या (Demonetisation) चार वर्षानंतरही बनावट नोटांचे (Fake Notes) प्रस्थ कमी झाल्याचे दिसून आलेले नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (National Crime Records Bureau) जारी केलेल्या रिपोर्टमधून असे चित्र समोर आले आहे. NCRB च्या रिपोर्टनुसार, 2019 मध्ये देशभरातून जप्त केलेल्या बनावट नोटांमध्ये सर्वाधिक प्रमाण 2000 च्या नोटांचे होते. एनसीआरबीच्या (NCRB) वार्षिक क्राईम रिपोर्टनुसार, 2019 मध्ये जप्त केलेल्या बनावट नोटांची संख्या 2018 पेक्षा अधिक होती. (Fake Currency Notes: बँकांकडून चक्क RBI ची फसवणूक; नोटबंदीनंतर जमा केल्या तब्बल दीड कोटीच्या बनावट नोटा, पोलिसांची चौकशी सुरु)

2019 मध्ये देशभरातून जप्त केलेल्या बनावट नोटांची एकूण किंमत 25.39 कोटी इतकी होती, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ही रक्कम 2018 च्या 17.95 कोटी च्या तुलनेत खूप अधिक आहे. 2018 पेक्षा 2019 मध्ये नकली नोटांचे प्रमाण 11.7% वाढले. 2000 रुपयांच्या नोटेमध्ये हाय सिक्युरिटी फिचर असल्यामुळे ड्युपलिकेट नोट बनवणे शक्य नाही, असा दावा सरकारने यापूर्वी केला होता. परंतु, हा दावा खोटा ठरल्याचे चित्र समोर आले आहे.

बनावट नोटा चलनातून बाद व्हाव्यात हा नोटबंदी करण्यामागील प्रमुख उद्देश होता. द हिंदू च्या रिपोर्टनुसार, 2000 रुपयांच्या 90,566 खोट्या नोटा पूर्ण देशभरातून जप्त करण्यात आल्या आहेत. 2019 मध्ये जप्त केलेल्या खोट्या नोटांपैकी सर्वाधिक नोटा या कर्नाटक मध्ये 23,599 सापडल्या. तर गुजरात मधून 14494 आणि पश्चिम बंगाल मधून 13637 इतक्या नोटा जप्त करण्यात आल्या, असे  एनसीआरबीचा डेटा सांगतो.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या 2019-2020 च्या वार्षिक अहवालानुसार, 2019-20 मध्ये त्यांनी एकही 2000 रुपयांची नोट छापली नाही. 2019-20 या कालावधीमध्ये 2000 च्या नोटांचे चलन हे कमी करण्यात आले आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2020 पर्यंत एकूण नोटांपैकी 2000 रुपयांच्या नोटांचे प्रमाण हे 2.4% इतके आहे. मार्च 2019 मध्ये हे प्रमाण 3% इतके होते. तर मार्च 2018 मध्ये 3.3% इतके होते. मार्च 2018 मध्ये चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांची संख्या ही 33,632 लाख इतकी होती. ती कमी करुन मार्च 2018 मध्ये 32,910 लाख इतकी करण्यात आली होती आणि मार्च 2020 पर्यंत या संख्येत घट होऊन ती 27,398 लाख इतकी करण्यात आली.