Mutant COVID-19 Strain: एका आठवड्यात ब्रिटनमधून राजस्थानमध्ये आले 800 पर्यटक; अनेकांनी चुकीचे पत्ते व फोन नंबर दिल्याने शोधणे अवघड
Tourists (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे (COVID-19 Strain) ब्रिटनमध्ये हाहाकार माजला आहे. हा स्ट्रेन 70 ते 100 टक्के अधिक संसर्गजन्य आहे व म्हणूनच कमी वेळात मोठ्या प्रमाणावर कोरोनाची नवीन प्रकरणे पाहायला मिळत आहेत. या स्ट्रेनमुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये खळबळ उडाल्यानंतर आता हा स्ट्रेन आपल्याकडे पोहोचू नये म्हणून प्रत्येक देश प्रयत्न करीत आहे. भारतानेही यासाठी काही पावले उचलली होती मात्र अखेर भारतामध्ये या स्ट्रेनने शिरकाव केलाच. आता ब्रिटनमधील नवीन कोरोना स्ट्रेनमुळे राजस्थान (Rajasthan) सरकार अडचणीत सापडले आहे. गेल्या एक आठवड्यात 800 हून अधिक ब्रिटिश पर्यटक राज्यातील 28 जिल्ह्यात दाखल झाले आहेत व आता त्यांचा मागोवा घेणे अवघड ठरले आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक 333 ब्रिटिश मागारिक जयपूर येथे आले. त्यापाठोपाठ जोधपूर (73), अजमेर (70), अलवर (48), उदयपूर (43), कोटा (39), झुंझुनू (24), गंगानगर (38), राजसमंद (35) आणि आणखी बऱ्याच ठिकाणी बरेच नागरिक आले आहेत. मात्र यातील अनेकांनी त्यांच्या संपर्क तपशिलामध्ये नमूद केलेले पत्ते व फोन नंबर चुकीचे आहेत. यामुळेच या लोकांना शोधणे अवघड ठरले आहे. याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्वतःचे संपर्क तपशील लपवणाऱ्या लोकांना दंड आकारला जाईल, याची खात्री करण्यासाठी अधिकृत आदेश दिले जाऊ शकतात.

यासह, केंद्र सरकारने पुरविलेल्या यादीत अनेक लोकांचे मोबाइल नंबर हे नऊ अंकी आहेत, ज्यामुळे अशा लोकांचा शोध घेणे अवघड झाले आहे. इतर नंबर त्यांच्या यूकेच्या पत्त्यांवरील आहेत. अधिकाऱ्यांनी या ठिकाणीही संपर्क साधायचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. जयपूरचे सीएमएचओ नरोत्तम शर्मा यांनी ही माहिती दिली. शर्मा यांनी आयएएनएसला पुष्टी केली की यूकेमधून जयपूरला आलेल्या 333 लोकांपैकी सोमवारपर्यंत 17 जणांचा संपर्क होऊ शकला नव्हता. मात्र पोलिसांच्या मदतीने मंगळवारी सकाळी चार जणांचा शोध लागला. (हेही वाचा: भारतात नव्या कोरोना व्हायरसचा शिरकाव; ब्रिटनहून आलेल्या 6 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)

शर्मा पुढे म्हणाले की, ‘या ब्रिटीश पर्यटकांचे स्क्रीनिंग आणि नमुने घेण्यास सुरुवात झाली आहे. आम्ही ब्रिटनहून आलेल्या सर्वांवर नजर ठेवून आहोत. तीन-चार दिवसांत आम्ही ब्रिटनमधील प्रत्येक पर्यटका शोधून काढू.’