New Coronavirus Strain in India: भारतात नव्या कोरोना व्हायरसचा शिरकाव; ब्रिटनहून आलेल्या 6 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

New Coronavirus Strain in India: ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना विषाणूचा (New Coronavirus Strain) शिरकाव आता भारतात झाला आहे. भारतासाठी ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. ब्रिटनहून भारतात आलेल्या 6 जणांना नव्या कोरोना विषाणूचं संक्रमण झालं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भारताची डोकेदुखी आता वाढली आहे. आतापर्यंत 16 देशात नव्या कोरोना विषाणूचा फेलाव झाला आहे.

दरम्यान, 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात ब्रिटनमधून 33 हजार नागरिक भारतात परतले. या सर्व प्रवाशांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. यातील 114 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर या प्रवाशांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने देशातील 10 प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. (हेही वाचा - COVID-19 Vaccine Update in India: मोदी सरकार लवकरच कोरोना लस वापरण्यासाठी हिरवा कंदील दाखवण्याची शक्तता, 50 दशलक्ष डोस तयार - अदार पूनावाला)

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बेंगलोरमधील NIMHANS मध्ये तीन, हैदराबादच्या CCMB मध्ये दोन आणि पुणे येथील एनआयव्हीमध्ये एका रुग्णांला नव्या कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू पहिल्या कोरोना विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक घातक आहे. नव्या कोरोना विषाणूच्या भीतीमुळे अनेक देशांनी ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवा बंद केल्या आहेत. भारतानेदेखील नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत थांबवल्या आहेत. या कालावधीत भारत आणि युके दरम्यान किमान 60 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.