Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) दमोह (Damoh) येथील एका ख्रिश्चन मिशनरी संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोप आहे की, रुग्णालयात एका व्यक्तीने बनावट हृदयरोगतज्ज्ञ असल्याचे भासवून लोकांवर शस्त्रक्रिया केल्या. ज्यामुळे वेगवेगळ्या वेळी 7 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही करण्यात आली आहे. या प्रकरणात आता पोलीस आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) यांनी तपास सुरू केला आहे. या बनावट डॉक्टरचे नाव नरेंद्र विक्रमादित्य यादव असे असून, त्याने स्वतःला ब्रिटिश हृदयरोग तज्ज्ञ ‘डॉ. एन जॉन केम’ म्हणून सादर केले. हे नाव यूकेतील खरे प्रसिद्ध डॉक्टर प्रोफेसर जॉन कॅम यांच्याशी मिळते-जुळते आहे.

याबाबत दमोह येथील रहिवासी दीपक तिवारी नावाच्या व्यक्तीने शहरातील रुग्णालयावर हा आरोप केला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला लिहिलेल्या पत्रात दीपक तिवारी यांनी आरोप केला आहे की, मिशन हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागातील लोकांच्या मृत्यूची माहिती संबंधित पोलीस स्टेशन किंवा हॉस्पिटल चौकीला देण्यात आलेली नाही. तसेच, चुकीच्या उपचारांमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना शांत करण्यात आले आणि त्यांच्याकडून मोठी फी आकारण्यात आली. यासह मृतदेह शवविच्छेदन न करता नातेवाईकांना देण्यात आले.

तक्रारदार दीपक तिवारी यांनी रुग्णालयात झालेल्या मृत्यूंचा डेटा गोळा करून प्रकरणाची चौकशी करावी आणि आरोपी डॉक्टर तसेच रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून रुग्णालयाची नोंदणी रद्द करावी अशी मागणी केली आहे. अहवालानुसार, आरोपी यादवने डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या काळात कमीत कमी 15 शस्त्रक्रिया केल्या, ज्यात एंजियोग्राफी आणि एंजियोप्लास्टी यांचा समावेश होता. या शस्त्रक्रियांमुळे सात रुग्णांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे सांगितले गेले आहे, पण दीपक तिवारी यांच्या मते, मृतांचा आकडा यापेक्षा जास्त असू शकतो.

या घोटाळ्याचा पर्दाफाश फेब्रुवारीत झाला, जेव्हा काही रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरबाबत संशय व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, इथल्या रुग्णालयातील डॉक्टरच्या पात्रतेबाबत त्यांना शंका आहे. पुढे तपासात समोर आले की, यादव हा खरा डॉक्टरच नाही. त्याने बनावट  कागदपत्रे सादर करून मध्य प्रदेश मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी नसतानाही रुग्णालयात काम केले. 6 एप्रिल रोजी दमोहच्या कोतवाली पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि तोतायागिरीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल झाला. पोलिसांनी सांगितले की, यादवने आपली खोटी वैद्यकीय सादर केली होती, यासह आंध्र प्रदेश मेडिकल कौन्सिलमध्येही नोंदणीकृत नाही. सध्या तो फरार आहे, आणि त्याला शोधण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू आहे.

या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे, ती म्हणजे हे मिशन हॉस्पिटल आयुष्मान भारत योजनेत सामील आहे आणि सरकारकडून निधी घेत आहे. एएनएचआरसीच्या सदस्य प्रियांक कानूनगो यांनी सांगितले की, हा एक गंभीर गुन्हा आहे, आणि त्याची चौकशी करण्यासाठी आयोगाची टीम 7 ते 9 एप्रिल दरम्यान दमोहला भेट देईल. रुग्णालय व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत, कारण त्यांनी यादवला नोकरीवर ठेवण्यापूर्वी त्याच्या कागदपत्रांची पडताळणी नीट केली नाही. (हेही वाचा: पुण्यात पैशांअभावी Deenanath Mangeshkar Hospital ने उपचाराला दिला नकार; गर्भवती महिलेचा मृत्यू, राज्य सरकारने दिले चौकशीचे आदेश)

काही सूत्रांनी सांगितले की, यादवने यापूर्वीही हैदराबादमध्ये असाच गुन्हा केला होता, आणि त्याच्यावर तिथेही खटला दाखल आहे. दमोहचे जिल्हाधिकारी सुधीर कोचर यांनी सांगितले की, तपास पूर्ण झाल्यावरच अधिकृत निवेदन दिले जाईल. हा प्रकार दमोहच्या नागरिकांसाठी धक्कादायक आहे, कारण अनेकांनी या रुग्णालयावर विश्वास ठेवला होता. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील पारदर्शकता आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तपासातून रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची भूमिका आणि मृत्यूंची खरी संख्या याबाबत अधिक स्पष्टता येईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत, हा बनावट डॉक्टर आणि त्याच्या शस्त्रक्रियांनी दमोहच्या आरोग्य यंत्रणेवर काळा डाग निर्माण केला आहे.