प्रवासी कृपया लक्ष द्या! Ministry of Railway ने Covid-19 मार्गदर्शक तत्त्वे सहा महिन्यांसाठी वाढवली; मास्क घातला नसेल तर 500 रु. दंड
Indian Railways | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railway) गुरुवारी कोविड-19 शी (Coronavirus) संबंधित मार्गदर्शक तत्त्वे सहा महिन्यांसाठी किंवा पुढील निर्देशांपर्यंत वाढवली आहेत. अधिसूचनेत म्हटले आहे की, रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये मास्क न घातल्यास 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. भारतीय रेल्वे सेवेने प्रवाशांना विनंती केली आहे की, त्यांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी विविध राज्यांनी जारी केलेल्या आरोग्य सल्लागार मार्गदर्शक सूचना वाचाव्यात. यापूर्वी, 17 एप्रिल 2021 रोजी भारतीय रेल्वेने स्थानकांवर लोकांनी मास्क घालण्याबाबत विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.

17 एप्रिल रोजी जारी केलेल्या अधिसूचनेचा संदर्भ देत रेल्वेने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, मार्गदर्शक तत्त्वे 16 एप्रिल 2022 पर्यंत किंवा पुढील निर्देशांपर्यंत वाढवली जात आहेत. जुन्या अधिसूचनेची वैधता या महिन्यात 16 ऑक्टोबर रोजी संपत होती. रेल्वेची ही घोषणा अशा वेळी आली आहे जेव्हा देशात नवीन 22,431 लोक कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यासह, देशातील कोरोनाव्हायरस संक्रमणाची एकूण संख्या वाढून 3,38,94,312 झाली आहे.

आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. सणांच्या वेळी, आपल्या घरी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढते. अशा परिस्थितीत, रेल्वेला कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही, जेणेकरून कोरोनाची प्रकरणे वाढतील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी उत्सवाच्या विशेष गाड्यांच्या 2 जोड्यांचा परिचालन कालावधी वाढवण्यात आला आहे. (हेही वाचा: Indian Railway Bonus: सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वी मोठी भेट; मिळणार बोनस म्हणून 78 दिवसांचा पगार)

रेल्वेकडून कोरोना विषाणू संसर्ग पाहता, एसी बोगीमध्ये दिली जाणारी चादर आणि ब्लँकेट देखील थांबवण्यात आले आहे. यासह, राजधानीसारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये प्रवासादरम्यान अन्न पुरवले जात नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेने ही पावले उचलली आहेत.