Indian Railways | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

भारतीय रेल्वेने (Indian Railway) फेस्टीव्ह सिझनमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोनसबाबतचा (Bonus) निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस मंजूर केला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वी बोनस दिला जाईल. दरवर्षी 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून दिला जातो. रेल्वेच्या सुमारे 11.56 लाख अ-राजपत्रित (Non-Gazetted) कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल.

सूत्रांचे म्हणणे आहे की यावेळी रेल्वे कर्मचाऱ्याला 18000 रुपये बोनस म्हणून मिळू शकतात. पत्रकार परिषदेदरम्यान अनुराग ठाकूर म्हणाले की, बोनस साधारणपणे 72 दिवसांचा पगार म्हणून दिला जातो, पण सरकार 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून देत आहे. 11.56 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी साधारण 1985 कोटी रुपये खर्च केले जातील.

रेल्वेचा हा उत्पादकता आधारित बोनस सर्व नॉन-राजपत्रित कर्मचाऱ्यांना (आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचारी वगळता) प्राप्त होईल. रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवर्षी दुर्गा पूजा/दसऱ्यापूर्वी पीएलबी (PLB) मिळतो. आदेशानुसार, जे कर्मचारी 31 मार्च 2021 पर्यंत सेवेत आहेत आणि त्यांना आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान निलंबित किंवा सोडले गेले नाही किंवा निवृत्त केले गेले नाही त्यांना बोनस दिला जाईल. (हेही वाचा: केंद्रीय कर्मचारी, पेंशनर्स यांना DA, DR Arrears बाबत मिळू शकते गूड न्यूज; PM Narendra Modi लवकरच घेणार अंतिम निर्णय)

सरकार इतर कर्मचाऱ्यांना नॉन प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (NPLB) देते. त्याची कमाल मर्यादा 1200 रुपये दरमहा आहे. याशिवाय कोल इंडिया लि.ने आर्थिक वर्ष 2020-21 साठी त्याच्या सर्व नॉन-एक्झिक्युटिव्ह कॅडरच्या कर्मचाऱ्यांना प्रति कर्मचारी 72,500 बोनस (PLR) जाहीर केला आहे. महारत्न कंपनीने सांगितले की, पीएलआर 11 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी दिला जाईल.