पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची गळा दाबून हत्या

उत्तर प्रदेशातील मेरठ (Meerut) जिल्ह्यातील बहुसुमा भागातील अकबरपूर सादत गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी अमित उर्फ ​​मिक्की कश्यप (25) नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी माहिती मिळाली होती की, अमित त्याच्या पलंगावर झोपलेला असताना त्याला सापाने 10 वेळा चावा घेतला. सकाळपर्यंत तो साप अमितच्या पलंगावर होता. त्यानंतर सकाळी कुटुंबाने एका सर्पमित्राला बोलावून सापाला पकडले. नंतर अमितला डॉक्टरकडे नेण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. आता या घटनेबाबत मोठा खुलासा झाला आहे.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार, तरुणाचा मृत्यू साप चावल्याने झाला नाही तर गळा दाबल्याने झाला. तपासानंतर पोलिसांनी उघड केले की, मृताच्या पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीचा अमितचा गळा दाबून खून केला. यानंतर, मृतदेहाखाली एक साप ठेवण्यात आला जेणेकरून असे दिसून येईल की मृत्यू सापाच्या चाव्यामुळे झाला आहे. बुधवारी संध्याकाळी पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला तेव्हा त्यात, लिहिले होते की अमितचा मृत्यू साप चावल्याने नव्हे तर गळा दाबून झाला होता. ही माहिती मिळताच पोलिसांनी हत्येच्या दृष्टिकोनातून प्रकरणाचा तपास सुरू केला.

तपासादरम्यान, पोलिसांना संशय आला की हे प्रकरण केवळ अपघात नसून एकाचे खुनाचे आहे व हा खून लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. चौकशीदरम्यान, अमितची पत्नी रविता हिची चौकशी केली, तेव्ह तिनेच ही हत्या केल्याचे उघड झाले. रविताचे त्याच गावातील एका तरुणाशी अवैध संबंध होते. या अवैध संबंधात अडथळा ठरणाऱ्या अमितला दूर करण्यासाठी रविताने तिच्या प्रियकरासोबत मिळून हा कट रचला. अमितचा प्रथम गळा दाबून खून करण्यात आला आणि नंतर एक विषारी साप आणून त्याच्या बेडखाली ठेवण्यात आला, जेणेकरून असे वाटेल की त्याचा मृत्यू साप चावल्याने झाला आहे.

(हेही वाचा: HC on Runaway Couples: 'पालकांच्या मर्जीविरुद्ध लग्न करणाऱ्या जोडप्यांना संरक्षणाचा अधिकार नाही': Allahabad High Court ची मोठी टिपण्णी)

सकाळी हा साप बेडवर होता व अमितच्या शरीरावर 10 ठिकाणी साप चावल्याच्या खुणा दिसून आल्या. आता पोलिसांनी रविता, तिचा प्रियकर आणि गावातील आणखी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे. या तिघांचीही कट रचण्याबाबत कसून चौकशी केली जात आहे. सुरुवातीच्या तपासात हत्येची पुष्टी झाली असून, या प्रकरणात लवकरच अटकेची कारवाई केली जाईल.