Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणाची हद्द असलेली एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी (Varanasi) जिल्ह्यात घडली आहे. येथील एका खासगी डॉक्टरने शस्त्रक्रिया करतानाच रुग्णाचा चक्क भलताच अवयव काढला. प्रवीण तिवारी असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. तो शहरात खासगी नर्सिंग होम चालवतो. स्थानिक न्यायालयाच्या आदेशानंतर गंभीर निष्काळजीपणाबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिवारी याच्याकडे एक महिला उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी आली होती. डॉक्टरने या महिलेचे शस्त्रक्रिया करुन पित्त मूत्राशय (Gall Bladder) ऐवजी गर्भाशय (Uterus) काढले आहे.

डॉक्टरच्या बेजबाबदारपणाने खळबळ उडाल्यावर पोलिसांनी आरोपीवर IPC कलम 336, 337, 338 (इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या कृतीमुळे गंभीर दुखापत करणे) आणि 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने जाणूनबुजून अपमान) यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची डॉक्टरांच्या समितीमार्फत चौकशी केली जाईल, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी संदीप चौधरी यांनी सांगितले. पोलीसही या प्रकरणाचा तपास करणार आहेत. (हेही वाचा, Tweezers Left in Patient’s Stomach: सिझेरियन प्रसूतीवेळी डॉक्टरांचा निष्काळजीपणा; 5 वर्षांपूर्वी शस्त्रक्रियेदरम्यान पोटात राहिला चिमटा, आरोग्य मंत्र्याकडून चौकशीचे आदेश)

नेमके प्रकरण काय?

वाराणसीच्या चोलापूर ब्लॉकमधील बेला गावात राहणाऱ्या उषा मौर्य नामक महिलेला पोटात तीव्र वेदना होत होत्या. वेदना असहय्य झाल्याने तिने गावातील एका आशा कार्यकर्त्याशी संपर्क साधला. यानंतर, आशा कार्यकर्त्याने तिला गोला येथील तिवारी चालवल्या जाणार्‍या खाजगी नर्सिंग होममध्ये नेले जेथे उषाच्या पित्त मूत्राशयात दगड (मूतखडा) असल्याचे निदान झाले. 28 मे 2020 रोजी, डॉक्टरांच्या दवाखान्यात तिचे पित्त मूत्राशय काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. तथापि, या वर्षी मार्चमध्ये, उषाला पुन्हा एकदा तिच्या ओटीपोटात एक परिचित तीक्ष्ण वेदना जाणवली. सूत्रांनुसार, तिने पाचक टॅब्लेट घेतली पण वेदना कायम राहिली. तिला बनियापूर येथील दुसऱ्या एका खासगी नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. तिथे लक्षात आले की, तिच्यावर मूतखड्याची कोणतीही शस्त्रक्रिया झाली नाही. तिचे पित्त मूत्राशय खड्यासह तसेच आहे. मात्र, तिचे गर्भाशय मात्र गायब आहे.

चाचणी अहवाल घेऊन उषा डॉ. तिवारीकडे परत गेली आणि स्पष्टीकरण मागितले. परंतु त्याने तिला धमक्या देण्यास सुरुवात केली. पोलिस ठाण्यांमध्ये अनेक फेऱ्या मारल्यानंतर तिने स्थानिक न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आरोपी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला. तिने तक्रार दाखल केल्यानंतर चोलापूरचे स्टेशन अधिकारी राजेश त्रिपाठी यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असून लवकरच कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.