
मणिपूरमध्ये (Manipur Violence) कुकी अतिरेकी आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाला. ज्यामध्ये एक पोलीस कमांडो मारला गेला आहे. टेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह या सीमावर्ती शहरात सुरक्षा दल आणि संशयित कुकी दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. यामध्ये एका पोलीस कमांडोचा मृत्यू झाला आहे. सध्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. डब्ल्यू सोमोरजीत असं मृताचे नाव आहे. तर आणखी एक कमांडो जखमी झाला आहे. वॉर्ड 7 जवळ दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. हा गोळीबार एक तासाहून अधिक काळ सुरू होता. ( Manipur Violence: मणिपूर तेंगनौपालमध्ये सशस्त्र जमावाचा सुरक्षा दलावर हल्ला, कमांडो जखमी)
मणिपूर सरकारने शांततेचा भंग, सार्वजनिक शांतता बिघडवणे आणि तेंगनौपालच्या महसूल प्राधिकरण क्षेत्रात मानवी जीवन आणि मालमत्तेला गंभीर धोका निर्माण होण्याच्या भीतीने जिल्ह्यात संपूर्ण कर्फ्यू लागू केला आहे. मणिपूर सरकारने 16 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजल्यापासून संपूर्ण कर्फ्यू लागू केलाय.
मणिपूरमध्ये मे महिन्यापासून हिंसाचार हा सुरु आहे. 3 मे रोजी मेईतेई आणि कुकी-झोमी समुदायांमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून 200 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि अनेक शेकडो जखमी झाले आहेत. मणिपूरच्या लोकसंख्येपैकी 53 टक्के लोकसंख्या मेईतेई आहेत आणि ते बहुतेक इम्फाळ खोऱ्यात राहतात.