महादेव बेटिंग अॅप प्रकरणी (Mahadev App) बेटिंग अॅपचा मालक रवी उप्पलला ताब्यात घेण्यात आलं आहे. दुबईमधून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली गेली होती. रवी उप्पलसह आणखी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. महादेव बुक अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते फरार असून दुबईत लपून बसले असल्याची माहिती होती. त्यामुळे ईडीने रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. अखेर दुबई विमानतळावर रवी उप्पलला ताब्यात घेण्यात आलं आहे. मुख्य आरोप सौरभ चंद्राकर अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू आहे. (हेही वाचा - Mahadev App Case: महादेव अॅप प्रकरणामध्ये तपासासाठी Mumbai Police कडून 4 सदस्यीय स्पेशल टीम)
महादेव बेटिंग अॅप प्रकरणात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. त्यामुळे याप्रकरणात अनेक बॉलिवूडकर रडारवर आले आहेत. या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नात 200 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे लग्न सौरभ चंद्राकरचं होतं. सौरभ हा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहे.
महादेव अॅप प्रकरणातील आरोपींनी 2023 या कालावधीत एकूण 15 हजार कोटी रुपयांचा जुगार आणि सायबर फसवणूक केली आहे. आरोपींविरोधात कलम 420, 465, 467, 120 बी, 12 अ, जुगार प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (क), 66 (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.