सर्वसामान्यांना झटका! मॅगी, चहा आणि कॉफीच्या किंमतीमध्ये वाढ, HUL आणि Nestle ने वाढवले उत्पादनांचे दर
Nestle (Photo Credit: PTI)

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे. पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेल महागल्यानंतर काही दिवसांपूर्वी साबण, सर्फ, डिशवॉश या गोष्टींच्या किंमतीही वाढल्या होत्या. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ने फेब्रुवारीमध्ये या उत्पादनांच्या किमती 3 ते 10 टक्क्यांनी वाढवल्या. आता CNBC TV18 च्या बातमीनुसार, HUL आणि Nestle ने चहा, कॉफी, दूध आणि नूडल्स सारख्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. आजपासून या गोष्टींच्या किंमती वाढतील.

नेस्ले इंडियाने मॅगीच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ केली आहे. नेस्ले इंडियाच्या म्हणण्यानुसार, मॅगीच्या किमती आजपासून 9 टक्क्यावरून  16 टक्के पर्यंत वाढतील. म्हणजेच 70 ग्रॅम मॅगीच्या पॅकेटची किंमत आता 12 रुपयांवरून 14 रुपयांपर्यंत वाढणार आहे. त्याचवेळी 140 ग्रॅम मॅगीच्या पॅकेटच्या किमतीत रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 560 ग्रॅमच्या पॅकसाठी 96 रुपयांऐवजी 105 रुपये मोजावे लागणार आहेत.

नेस्लेने A+ दुधाच्या 1 लिटर कार्टनची किंमत 75 रुपयांवरून 78 रुपयांपर्यंत वाढवली आहे. नेसकॅफे क्लासिक कॉफी पावडरच्या दरात तीन ते सात टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर Nescafe क्लासिक 25 ग्रॅम पॅकमध्ये 2.5 ने वाढ करण्यात आली आहे. महागाईमुळे कंपनीवर दबाव असल्याचे एचयूएलने सांगितले. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा: LIC IPO: एलआयसी आयपीओ घ्यायचा विचार करताय? ही माहिती आपल्यासाठी ठरु शकते फायदेशीर)

समोर आलेल्या माहितीनुसार, ब्रू कॉफी पावडर 3 ते 7 टक्क्यांनी महाग झाली आहे. त्याच वेळी, ब्रू गोल्ड कॉफी जारच्या किमतीत 3-4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रू इन्स्टंट कॉफी पाऊचची किंमत 3 ते 6.6 टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय ताजमहाल चहाच्या किमतीत 3.7 ते 5.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सर्वांशिवाय नेस्ले इंडियानेही मॅगीच्या किमती 9 ते 16 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

HUL ने 7 महिन्यांत चौथ्यांदा आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. एचयूएलची उत्पादने फेब्रुवारीमध्ये महाग झाली होती. यासह, कंपनीने नोव्हेंबरमध्ये आपल्या उत्पादनांच्या किमती 1 ते 33 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. 8 सप्टेंबर रोजी साबण आणि सर्फच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.