PM Narendra Modi to File Nomination on May 14: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 14 मे रोजी वाराणसी (Varanasi) मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हा दिवस खूप खास आहे. 14 मे रोजी गंगा सप्तमी आणि पुष्य नक्षत्राचा अद्भुत संयोग आहे, जो ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानला जातो. अशा स्थितीत या नक्षत्रात उमेदवारी दाखल करणे पीएम मोदींसाठी उत्तम असल्याचे बोलले जात आहे. अयोध्या राम मंदिराचा अभिषेक आणि पायाभरणीसाठी शुभ मुहूर्त देणारे पं. गणेशवर शास्त्री द्रविड यांनीदेखील 14 मे रोजीचा मुहूर्त सर्वोत्तम असल्याचे सांगितले आहे.
आज म्हणजेच 13 रोजी सकाळी 11.23 पासून पुष्य नक्षत्र सुरू होऊन ते 14 मे रोजी दुपारी 1.05 पर्यंत असणार आहे. यानंतर आश्रलेशा नक्षत्र सुरू होईल. पुष्य नक्षत्रात कोणतेही काम केल्यास त्यात यश निश्चित मानले जाते. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीनुसार, नामांकन दाखल करण्यासाठी सर्वोत्तम ग्रहस्थिती तयार केली जात आहे. अहवालानुसार, पीएम नरेंद्र मोदी 14 मे रोजी सकाळी काल भैरव मंदिराला भेट दिल्यानंतर 11.30 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
हा असू शकतो पंतप्रधानांचा वाराणसीमधील कार्यक्रम-
आज, 13 मे रोजी वाराणसीत सायंकाळी 5 वाजता रोड शो
उद्या, 14 मे रोजी सकाळी 10.15 वाजता काल भैरव मंदिराला भेट
त्त्यानंतर सकाळी 11.40 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार
दुपारी 12.15 वाजता कार्यकर्त्यांची बैठक
दुपारी 12.30 वाजता सिग्रा येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण
14 मे रोजी गंगा सप्तमीसोबत भौम पुष्य नक्षत्राचा योगायोग आहे. भौम पुष्य नक्षत्रामुळे पद, प्रतिष्ठा आणि ऐश्वर्य निर्माण होते अशी मान्यता आहे. यासोबतच या दिवशी अभिजित मुहूर्त, आनंद आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार गंगा सप्तमी आणि भौम पुष्य नक्षत्र यांच्या संयोगाने ग्रहांची स्थिती उत्तम स्थिती निर्माण करत आहे. या दिवशी कोणतेही काम केल्याने इच्छित यश प्राप्त होते, असे समजले जाते. सुमारे 7 वर्षानंतर गंगा सप्तमीला पुष्य नक्षत्र आणि प्रवर्धमान योग तयार होत आहे जो अत्यंत फलदायी मानला जातो. म्हणूनच कदाचित पंतप्रधानांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी हा दिवस निवडला असावा.