Shocking Photos Of Sinking Joshimath (Photo Credits: Twitter/ANI)

उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये भूस्खलनाचे प्रकरण अजूनही थांबले नाही, तोच पुन्हा एकदा अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील संवेदनशील 147 जिल्ह्यांपैकी ईशान्येतील 64 जिल्हे भूस्खलनग्रस्त जिल्हे (Landslide Risk Districts) म्हणून ओळखले गेले आहेत. अंतराळ विभागाच्या अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरच्या लँडस्लाईड ऍटलसमध्ये हे उघड झाले आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग आणि टिहरी गढवाल जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाची घनता देशात सर्वाधिक आहे.

अहवालात असे निदर्शनास आणले आहे की देशातील भूस्खलनाने सर्वाधिक प्रभावित असलेल्या पहिल्या 10 जिल्ह्यांपैकी 2 जिल्हे सिक्कीम- दक्षिण आणि उत्तर सिक्कीममधील आहेत. तसेच, 2 जिल्हे जम्मू-काश्मीरचे आणि 4 जिल्हे केरळचे आहेत.

सर्वेक्षणादरम्यान 147 अतिसंवेदनशील जिल्ह्यांचा अभ्यास करण्यात आला. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग आणि टिहरी गढवाल जिल्ह्यांमध्ये देशातील सर्वाधिक भूस्खलन घनता आहे आणि पश्चिम हिमालयीन प्रदेश भूस्खलनासाठी सर्वात असुरक्षित आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेशी संलग्न असलेल्या प्रमुख संस्थेने उघड केले आहे. देशातील 17 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 147 जिल्ह्यांमध्ये 1988 ते 2022 दरम्यान नोंदवलेल्या 80,933 भूस्खलनाच्या आधारे, NRSC शास्त्रज्ञांनी भारतातील भूस्खलन ऍटलसच्या निर्मितीसाठी जोखीम मूल्यांकन केले.

आजही जोशीमठ उत्तराखंड सरकारसाठी मोठे आव्हान आहे. जोशीमठसह उत्तराखंडमधील विविध भागात जमिनीला तडे गेल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. एक पथक तपासणीसाठी आले असता त्यांना 25 घरांमध्ये मोठ्या भेगा आढळल्या. यापैकी 8 घरे अतिधोकादायक घोषित करण्यात आली असून, या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. जोशीमठमध्ये जमीन खचल्यानंतर आणि घरांच्या भिंतींना तडे गेल्यानंतर आता जोशीमठ-बद्रीनाथ महामार्गावर भेगा पडल्या आहेत. महामार्गावर पाच ठिकाणी हे तडे दिसले आहेत. (हेही वाचा: गुजरातमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण)

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (BRO) नवीन तडे दिसू लागल्यानंतर त्याची माहिती जारी केली आहे. बीआरओ टीमने भेगा पडलेल्या ठिकाणी दुरुस्ती केली आहे. जोशीमठच्या एसडीएम कुमकुम जोशी यांनी सांगितले की, या भेगा गेल्या वर्षीही दिसल्या होत्या आणि त्यावेळी दुरुस्तीचे काम केले होते. हे खड्डे 4 मीटर खोल होते, ते भरण्यात आले आहेत. भेगा तपासण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे.

दरम्यान, आता जोशीमठसारख्या आपत्तीची माहिती आधीच मिळणार आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्रोने अमेरिकन स्पेस एजन्सी (NASA) च्या सहकार्याने एक विशेष सॅटेलाइट विकसित केला आहे. सुमारे 10,000 कोटी रुपये खर्चून तयार केलेला हा निसार सॅटेलाइट (NISAR Satellite) भारताकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या उपग्रहाची विशेष बाब म्हणजे भूकंप, हिमस्खलन, समुद्रातील वादळ आदी नैसर्गिक घटनांची माहिती तो आगाऊ देईल. संपूर्ण जगाला या उपग्रहाचा फायदा होणार आहे. हे भारत आणि अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संयुक्त विज्ञान अभियान मानले जात आहे.