West Bengal News: आरजी कर मेडिकल कॉलेज (RG Kar Medical College) आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या हिंसक हल्ल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी (Kolkata Police) 19 जणांना अटक केली आहे. जमावाने रुग्णालयाच्या परिसराची तोडफोड केल्यानंतर काही दिवसांनी ही अटक करण्यात आली आहे. या तोडफोडीमुळे वैद्यकीय समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, याच ठिकाणी एका प्रशिक्षणार्थी तरुण महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. सदर प्रकरणाचा तपास सीबीआय (मवग) या केंद्रीय संस्थेद्वारे सुरु आहे. दरम्यानच ही तोडफोडीची घटना घडली. कोलकाता येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे.
फेसबुकवरील व्हिडिओमुळे आरोपींची ओळख पटली
कोलकाता पोलिसांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या हिंसक हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 5 जणांना त्यांनी फेसबुक या सोशल मीडिया मंचावर दिलेल्या प्रतिक्रियेवरुन ओळखण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. तसेच, तुम्ही आमच्या आधीच्या पोस्ट्सवरून संशयितांपैकी कोणाला ओळखले असल्यास, कृपया आम्हाला कळवा, असे अवाहनही पोलिसांनी केले आहे. (हेही वाचा, IMA Strike Over Kolkata Doctor Murder Case: आयएमएचा देशव्यापी संप; रुग्णालयातील यंत्रणा कोलमडणार? कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण)
कोलकाता पोलिसांकडून मदत आणि सहकार्याचे अवाहन
दरम्यान, संशयित आरोपींना अटक करण्यापूर्वी पोलिसांनी तोडफोडीमध्ये सहभागी असलेल्या संशयितांच्या प्रतिमा प्रसिद्ध केल्या आणि त्यांना ओळखण्यात मदत करण्यासाठी लोकांना आवाहन केले. बॅरिकेड्सवर हल्ला करताना दाखविणारा एक व्हिडिओ सोशल मीडियात सामायिक (शेअर) करण्यात आलाहोता. ज्यामध्ये जबाबदार व्यक्तींना ओळखण्यासाठी पोलिसांकडून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. पोलिसांनी आश्वासन दिले आहे की, आरोपींबद्दल माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल. तसेच, तपासात अथवा कारवाईत कोणत्याही प्रकारचा अडथळा आणल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
एक्स पोस्ट
19 arrests so far in RG Kar hospital vandalism. Five of them were identified by social media feedback. If you recognise any of the suspects from our earlier posts, kindly inform us. Thank you for your support & trust. pic.twitter.com/zyY4sOgjBi
— Kolkata Police (@KolkataPolice) August 16, 2024
इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे संपाची घोषणा
आर जी कर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात14 ऑगस्टच्या रात्री 5,000 ते 7,000 लोकांच्या जमावाने हल्ला केला तेव्हा तोडफोडीची घटना घडली. डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेनंतर भारतभरातील डॉक्टरांनी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने शनिवार, 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते रविवार, 18 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत सेवा मागे घेण्याचे आवाहन केले आहे. आरजी कार मेडिकल कॉलेजमधील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.