Doctor On Strike | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने आज (16 ऑगस्ट) देशभरातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उद्या (शनिवार, 17 ऑगस्ट) देशव्यापी संपाची घोषणा (IMA Doctor Nationwide Strike) केली आहे. कोलकाता येथील आर जी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (R G Kar Medical College and Hospital in Kolkata) एका प्रशिक्षणार्थी तरुण महिला डॉक्टरवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्येप्रकरणी (Rape and Murder Case) आयएमएने ही भूमिका घेतली आहे. दरम्यान, आपत्कालीन सेवा मात्र सुरु राहतील असे सांगतानाच कोलकाता येथील प्रकरणाचा निषेध म्हणून ओपीडी सेवा बंद ठेवण्याचे अवाहन आयएमएने केले आहे.

रुग्णालयांना सुरक्षीत क्षेत्र घोषीत करण्याची मागणी

IMA कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विनय अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांसी बोलताना सांगितले की, आमच्या मागण्यांमध्ये मृतांना न्याय, डॉक्टरांना हिंसाचारापासून वाचवण्यासाठी केंद्रीय कायदा आणि रुग्णालये सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करणे या मागण्यांचा समावेश आहे. त्यांनी या घटनेनंतर कोलकाता येथील आर जी कर रुग्णालयात झालेल्या तोडफोडीचाही त्यांनी निषेध केला. (हेही वाचा, Kolkata Doctor Rape-Murder Case: आयएमएकडून 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजल्यापासून देशव्यापी 24 तासांच्या संपाची घोषणा; अत्यावश्यक सेवा चालू राहतील)

आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये हिंसाचार

दरम्यान, कोलकाता येथील प्रकरणानंतर फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (FORDA) ने आपला देशव्यापी संप पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी रात्री आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. FORDA केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या भेटीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकारला अपयश आल्यानेच डॉक्टरांनी हा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. यापूर्वी मंत्रालयाच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला होता. पण, आश्वासनपुर्तीला यश आले नाही.

सरकारी अपयशाचा FORDA कडून निषेध

FORDA चे अध्यक्ष डॉ. अविरल माथूर यांनी सांगितले की, आम्ही हे मान्य करतो की, संप मागे घेण्याच्या आमच्या आधीच्या निर्णयामुळे आमच्या डॉक्टरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. रुग्णालयात झालेल्या ताज्या हिंसाचाराने सर्वांनाच धक्का बसला आहे आणि व्यथित केले आहे. आम्ही आमच्या सहकारी निवासी डॉक्टरांसोबत एकजुटीने उभे आहोत आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात केंद्रीय मंत्रालय आणि राज्य सरकारच्या अपयशाचा तीव्र निषेध करतो.

दुसऱ्या बाजूला या घडामोडींना प्रतिसाद म्हणून, FORDA, केंद्रीय सरकारी नर्सिंग फेडरेशनच्या सहकार्याने, शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता इंडिया गेटवर मेणबत्ती मोर्चाचे आयोजन केले आहे. देशभरातील वैद्यकीय व्यावसायिकांना न्याय, सुरक्षितता आणि सन्मानाची मागणी करणे हा या मोर्चाचा उद्देश आहे. FORDA ने IMA आणि दिल्ली मेडिकल असोसिएशनसह डॉक्टर, आरोग्य सेवा संस्था आणि वैद्यकीय संघटनांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

दिल्लीच्या निवासी डॉक्टर्स असोसिएशनच्या संयुक्त मंचाने शुक्रवारी निर्माण भवनावर निषेध मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. दिल्लीतील वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या चिंता व्यक्त करण्यासाठी आणि रुग्णालयांमधील वाढत्या हिंसाचारावर कारवाईची मागणी करण्यासाठी मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.