एप्रिल 2016 साली भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, भारताचा कोहिनूर हिरा हा बळजबरीने किंवा चोरून ब्रिटिशांकडे गेलेला नसून तो आपण भेटवस्तूच्या स्वरूपात दिला होता. मात्र आता पुरात्त्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोहिनुर हा नुकसान भरपाईच्या स्वरूपात ब्रिटिशांकडे गेला आहे.
सरकारच्या मतांमध्ये विरोधाभास
माहिती कायद्याअंतर्गत रोहित सभारवाल यांनी कोहिनुर हिरा ब्रिटिशांकडे कसा गेला याबद्दल माहिती विचारली होती. नेमकी ही माहिती कोणत्या विभागाकडून मिळेल हे त्यांना ठाऊक नव्हते. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाकडे संबंधित अर्ज गेला. पंतप्रधान कार्यालयाने हा अर्ज पुरात्त्व विभागाकडे पाठवला आहे.
माहितीच्या कायद्याअंतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार, लाहोरचे महाराज रणजित सिंग यांनी अॅंग्लो - शीख वॉरदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून कोहिनुर हिरा इंग्लंडच्या राणीला देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. कोहिनुर हिर्यावरून सरकार आणि पुरातत्त्व विभागाच्या मतांमधील विरोधाभास समोर आल्याने आता पुन्हा नव्या चर्चांना, आरोप-प्रत्यारोपांना उधाण येणार आहे.