दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर आता कर्नाटकातही (Karnataka) असेच प्रकरण समोर आले आहे. राज्यातील बागलकोटमध्ये (Bagalkot) एका व्यक्तीने आपल्या वडिलांची हत्या करून मृतदेहाचे 32 तुकडे केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने हे तुकडे उघड्या बोअरवेलमध्ये फेकले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अर्थ मूव्हर्सच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेतला. विठ्ठला कुलाली असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 6 डिसेंबरची आहे. आरोपीचे वय सुमारे 20 वर्षे आहे. रागाच्या भरात त्याने त्याचे वडील परशुराम कुलाली (53) यांची लोखंडी रॉडने हत्या केली. दारूच्या नशेत परशुराम शिवीगाळ करायचा. त्याची पत्नी आणि मोठा मुलगा वेगळे राहतात. गेल्या आठवड्यात मंगळवारीही मद्यधुंद अवस्थेत परशुरामने शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्यावर आरोपीने रागाच्या भरात लोखंडी रॉडने वडिलांची हत्या केल्याचे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हत्येनंतर आरोपीने वडिलांच्या मृतदेहाचे 32 तुकडे केले. त्यानंतर त्याने बागलकोट जिल्ह्यातील मुधोल या शहराच्या बाहेरील मंतूर बायपासजवळील शेतातील एका उघड्या बोअरवेलमध्ये शरीराचे अवयव फेकून दिले.
बोअरवेलमधून दुर्गंधी आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कथित हत्येमागे विठ्ठलाची भूमिका असल्याचा संशय व्यक्त केला. विठलाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मृतदेहाचे छिन्नविछिन्न भाग बोअरवेलमधून बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. (हेही वाचा: मतिमंद व्यक्तीने आईचा मृतदेह चार दिवस घराच्या पलंगाखाली ठेवला लपवून)
दिल्लीत श्रद्धा नावाच्या मुलीची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि जंगलात फेकून दिले. हत्येचा आरोपी आफताब पूनावाला हा श्रद्धा वॉकरचा लिव्ह-इन पार्टनर आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताबने गेल्या मे महिन्यात वैयक्तिक भांडणानंतर श्रद्धाची हत्या केली.