
कर्नाटकातील (Karnataka) चित्रदुर्गातून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी एका 17 वर्षीय मुलीने विष देऊन स्वतःच्या घरातील 4 सदस्यांची हत्या केली आहे. असे सांगण्यात येत आहे की, भावंडांमध्ये दाखवलेल्या भेदभावामुळे मुलगी त्रासली होती व रागाच्या भरात तिने हे टोकाचे पाऊल उचलले. इसामुद्रा गावातील लंबानीहट्टी येथे घडलेली ही घटना जुलैची आहे, जी आता सर्वांसमोर आली आहे. घरातील सर्व सदस्यांची हत्या करण्याची या मुलीची योजना होती व त्यामध्ये मुलीचे वडील, आई, आजी आणि बहीण यांचा मृत्यू झाला.
या विषामुळे आजारी पडलेला तिचा 19 वर्षीय भाऊ वाचला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जुलै रोजी कुटुंबातील सदस्यांनी रात्रीच्या जेवणासाठी 'रागी मुड्डे’ (नाचणीचे गोळे) खाल्ले होते, ज्यात कीटकनाशक मिसळले गेले होते. हे अन्न खाल्ल्यावर या सर्वांना उलट्या होऊ लागल्या आणि नंतर त्यातील चार जणांचा मृत्यू झाला. यावेळी आरोपी मुलीने फक्त भात आणि रसम खाल्ले होते.
सदस्यांनी खालेले अन्नपदार्थ आणि भांडी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली होती. तपासणीनंतर कुटुंबातील सदस्यांना दिल्या गेलेल्या अन्नात कीटकनाशके असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात आढळून आले की ही मुलगी तिच्या आजी-आजोबांकडे लहानाची मोठी झाली व साधारण तीन वर्षांपासून ती आपले आई-वडील व भावंडांसोबत राहत होती. आई-वडिलांच्या घरी तिच्या लक्षात आले की, आपल्याला इतर भावंडांपेक्षा कमी प्रेम मिळत आहे. आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये दुजाभाव केला जात आहे. (हेही वाचा: पोलिसाच्या कारची दोन मुलींना जोरात धडक; एकीचा जागीच मृत्यू, CCTV मध्ये कैद झाली अंगावर काटा आणणारी घटना)
अशा विचारांनी ती बरीच अस्वस्थ झाली. म्हणूनच तिने या सर्वांना विष देण्याचा निर्णय घेतला. तिने सांगितले की यापूर्वी एकदा कुटुंबातील सदस्यांना विष देण्याच्या प्रयत्नात ती अपयशी ठरली होती. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला मुलीच्या रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे.