Online Cricket Betting | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Karnataka Woman Dies By Suicide: कर्नाटक येथील एका महिलेने सावकाराच्या (Money Lender) धमक्यांना घाबरुन आणि त्यामुळे झालेल्या मनस्तापाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही घटना राज्यातील चित्रदूर्ग (Chitradurga) येथे घडली. प्राप्त माहितीनुसार, महिलेच्या पतीला ऑनलाईन क्रिकेट सट्टा (Online Cricket Betting) लावण्याची सवय होती. ज्यामध्ये त्याने सावकाराकडून घेतलेले तब्बल 1.5 कोटी रुपये गमावले. या पैशांच्या वसूलीसाठी सावकार सातत्याने तगादा लावत असे. दरम्यान, अवघ्या 24 वर्षीय महिलेच्या वडिलांनी पोलिसांशी संपर्क करुन दिलेल्या तक्रारीनंतर प्रकरणाला वाचा फूटली.

पीडितेच्या वडिलांनी पोलिसामध्ये दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, त्यांची मुलगी सावकाराचा दबाव आणि त्यातून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली. सावकार आणि त्यांचे लोक सातत्याने आपल्या मुलीच्या घरी येत. ते केव्हाही रात्री-अपरात्रीसुद्धा तिचा दरवाजा ठोठावत आणि पैशांची मागणी करत. (हेही वाचा, Ministry of I&B Cautions Social Media Influencers: 'ऑनलाइन सट्टेबाजी', 'जुगार' संदर्भात सोशल मीडिया प्रभावकांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून इशारा)

तक्रारदाराने पोलिसांना अधिक माहिती देताना सांगितले की, पीडित महिलेचा तिच्या पतीशी सन 2020 मध्ये विवाह झाला होता. अलिकडे म्हणजे पाठीमागच्याच वर्षी तिला समजले की, तिचा पती दर्शन यास ऑनलाईन सट्टा लावण्याचे प्रचंड व्यसन आहे. त्यासाठी तो मोठ्या प्रमाणावर कर्जेही काढत असतो. धक्कादायक म्हणचे तत्पूर्वी आपल्या मुलीला पतीच्या व्यसनाबद्दल यत्किंचीतही कल्पना नव्हती. (हेही वाचा, Fraud: ऑनलाइन सट्टेबाजीसाठी बँकेतील पैसा वापरल्याप्रकरणी खासगी बँकेच्या उपशाखा व्यवस्थापकाला माटुंगा पोलिसांकडून अटक)

दरम्यान, पैशांच्या वसूलीसाठी सावकार सातत्याने दर्शन याच्या घरी जात. त्यातून आपली मुलगी रंजीता आणि तिचा पती दर्शन यांच्यात सातत्याने वाद होत. धक्कादायक म्हणजे सावकार आणि त्याचे लोक रंजीता हिलासुद्धा घाणेरड्या शब्दात बोलत असत आणि पैशांसाठी इतर गोष्टींची मागणीही करत असत. ज्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावत असे. त्यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच,आतापर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटकही करण्यात आली आहे.

ऑनलाईन बेटींग देशभरात वाढत आहे. खास करुन नवतरुणवर्ग आणि अल्पकाळात श्रीमंत होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मंडळींचे ऑनलाईन बेटींग हा सर्वात मोठा आकर्षणाचा विषय असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारही बेटींगबाबत अनेक कडक धोरणे आणत आहे.