BS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'
BS Yediyurappa | (Photo Credit : Facebook)

कर्नाटक (Karnataka) राज्याचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा (BS Yediyurappa) यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोमवारी (26 जुलै) राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्याकडे सोपवला. बी एस येडीयुरप्पा (Bookanakere Siddalingappa Yediyurappa) यांनी कर्नाटकमधील भाजप (Karnataka BJP) सराकरला दोन वर्षे पूर्ण झालेनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज सकाळीच स्पष्ट केले होते की, दुपारनंतर आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर येडीयुरप्पा यांनी सांगितले की, राजीनामा देण्याबाबतचा निर्णय आपण स्वच्छेने घेतला आहे. त्यासाठी आपल्यावर कोणाचाही दबाव नव्हता.

बी एस येडीयुरप्पा यांनी म्हटले की, मुख्यमंत्री पदावरुन पायऊतार झालो तरी, आपण राजकाणात सक्रीय राहणार आहोत. भविष्यात आपण पक्षात कोणतेही पद मागणार नाही आहोत. पदाचा राजीनामा दिल्यावर भविष्यात रिकामे बसणे किंवा राजकारणातून निवृत्त होण्याचा प्रश्नच येत नाही. आपण पक्षात सक्रीय राहणार असून, पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहू असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना येडीयुरप्पा म्हणाले, मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, राजीनामा देण्यासाठी आपल्यावर कोणाचाही दबाव नव्हता. मी केवळ पदावर आल्यावर दोन वर्षे काम केले त्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे पी नड्डा, अमित शाह अथवा इतर कोणीही राजीनामा देण्यासाठी प्रवृत्त केले नाही. मी हा राजीनामा येवढ्याचसाठी देतो आहे की, पक्षाला मुख्यमंत्री म्हणून नवा चेहरा मिळावा. (हेही वाचा, BS Yeddyurappa: कर्नाटकमध्ये नेतृत्वबदलाची चर्चा, मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला उधान)

दरम्यान, बीएस येडीयुरप्पा यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. या दौऱ्यावेळी त्यांना मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आले होते. तेव्हा बोलताना येडीयुरप्पा यांनी म्हटले होते की माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. दरम्यान, त्याच दिवशी त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत चर्चा केली. प्रसारमाध्यमांनी या भेटीबाबतही विचारले असता त्यांनी सांगितले की, कर्नाटकमध्ये आम्ही पक्ष विस्ताराबाबत चर्चा करत आहोत. माझ्याकडे बरेच पर्याय आहेत. मी पक्षाला दुसऱ्यांदा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करेन.