Kalyan Banerjee Mimicry Video | (Photo Credit - X)

Kalyan Banerjee Mimicry Video: संसदेच्या दोन्ही सभागृहातून खासदारांना निलंबीत करण्याचा घटनाक्रम आजही (19 डिसेंबर) कायम राहिला. सभागृहातून संसद सदस्यांन निलंबीत करण्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांमध्ये तीव्र संतप आहे. सरकारविरोधातील आपला संताप संसद आवारात व्यक्त करताना तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा सभापतीं जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar Mimicry) नक्कल केली. खासदार नक्कल करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे त्या घटनेचे चित्रिकरण करत होते. या प्रकाराबद्दल उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे.

राज्यसभा सभापतींकडून तीव्र निषेध

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर संसदेबाहेर केलेल्या कृत्यांसाठी जोरदार टीका केली. धनखर यांनी या घटनेला "लज्जास्पद, हास्यास्पद आणि अस्वीकार्य" असे संबोधले. विरोधकांनी थोडीतरी सभ्यता बाळगायला हवी. इतक्या खाली घसरणे योग्य नव्हे असे ते म्हणाले. (हेही वाचा, Parliament MP Suspended: लोकसभेतून आज सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह 49 खासदारांचे निलंबन)

निलंबन विरोधीत निदर्शनांचा भाग

विरोधी पक्षातील खासदार त्यांच्या सहकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात आपला निषेध नोंदवत होते. त्या वेळी केवळ निदर्शनांचा भाग म्हणून विरोधी पक्षाच्या खासदारांकडून अशा पद्धतीचे वर्तन करण्यात आले. त्यात इतके वावगे वाटण्यासारखे काहीही नाही, अशी प्रतिक्रिया विरोधकांकडून येते आहे. (हेही वाचा - List of suspended MPs From LS: किती खासदार संसदेतून झाले निलंबीत? पाहा यादी)

कल्याण बॅनर्जी यांना निलंबीत करा, कायदामंत्र्यांची मागणी

कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी मात्र या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. सभापतींची अशा प्रकारे नक्कल करणे हे अतिशय गंभीर आहे. या प्रकारबद्दल ही नक्कल करणारे खासदार कल्याण बॅनर्जी यांना निलंबीत करावे, अशी मागणीही मेघवाल यांनी केली आहे. तसेच, अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी, असेही ते म्हणाले.

सर्वाधिक 141 खासदार निलंबीत

विद्यमान केंद्र सरकारच्या कार्यकाळात निलंबीत झालेल्या खासदारांचा आकडा थोडाथोडका नाही. आतापर्यंत एकूण 141 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे संसद सभागृहात घातलेल्या गोंधळाप्रकरणी आणि कामकाजात अडथळा आणलेप्रकरणी खासदारांना निलंबीत करण्यात आले आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, डॉ. आमोल कोल्हे, डेरेक ओब्रायन यांच्यासह इतरही अनेक खासदारांचा समावेश आहे. या निलंबनाबद्दल देशभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

व्हिडिओ

दरम्यान, कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या मिमिक्रीचा व्हिडिओ भाजपने आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन शेअर केला आहे. भाजपने हा व्हिडिओ शेअर करताना आपल्या एक्स हँडलवर म्हटले आहे की, खासदारांचे सामूहिक निलंबन हे टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या अनादरपूर्वक वर्तनाचा परिपाक आहे. ज्याचे राहुल गांधी यांनी समर्थन केले आहे.

काँग्रेसकडून पलटवार

काँग्रेसनेही भाजपच्या एक्स हँडलवरील पोस्टला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "प्रश्न विचारण्यास मनाई आहे" या मथळ्याखाली एक पोस्ट करत काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही X हँडलवरुन भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी नव्या संसदेचे वर्णन "सर्व जुलमी राजवटीत नामशाही" प्रतिबिंबित करते, आणि सद्यस्थितीबद्दल असंतोष दर्शवते, असे म्हटले आहे.