JMM chief Hemant Soren with Congress leader Rahul Gandhi (Photo Credits: IANS)

झारखंडमध्ये रघुवर दास यांच्या नेतृत्वात भाजपा (BJP) सरकारला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. यंदाची झारखंड विधानसभा निवडणुक हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या नेतृत्वात झामुमो-कॉंग्रेस-आरजेडी (Congress-JMM-RJD) आघाडीने जिंकली आहे. सध्याच्या निकालाप्रमाणे भाजपने 25 जागांवर विजय मिळवला आहे. कॉंग्रेसला 16 जागा, झामुमोला 30 जागा तर आरजेडीला 1 जागा मिळाली आहे. अशाप्रकारे या आघाडीने 47 जागांवर विजय प्राप्त करत बहुमत मिळवले आहे.

हेमंत सोरेन हे झारखंडचे पुढचे मुख्यमंत्री होतील. हेमंत सोरेन यांनी झारखंडमधील दोन विधानसभा जागांवर (दुमका आणि बरहेट) निवडणूक लढविली. हेमंत सोरेन यांनी बरहेट मतदारसंघात 25740 मतांनी आणि दुमका जागेवर 13188 मतांच्या फरकाने विजय मिळविला.

निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री रघुवर दास यांनी सोमवारी रात्री उशिरा रांची येथील राजभवनात, राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला. झारखंडमधील सर्व 81 विधानसभा जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. झारखंडच्या 81 सदस्यीय विधानसभेत बहुमताचा आकडा 41 आहे. झारखंडमध्ये महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी सोमवारी रांची येथे पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी, 'आजचा दिवस हा मैलाचा दगड ठरेल. आजचा दिवस हा आपल्यासाठी जनतेची सेवा करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. आज राज्यात जे निकाल आले आहेत ते आपल्या सर्वांसाठी उत्साहवर्धक आहेत.' अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

(हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं - राहुल गांधी)

रघुवर दास यांनीही पत्रकार परिषदेत सांगितले की, 'हा भाजपचा पराभव नाही तर माझा वैयक्तिक पराभव आहे. सर्व भाजपविरोधी मते एकत्र आली आणि आल्यानंतरच आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले.' संध्याकाळी पंतरधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीही नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या.