Jharkhand Political Crisis: झारखंडमध्ये राजकीय संकट; हेमंत सोरेन यांना अटक, सत्ताधारी आमदारांची हैद्राबादला स्थलांतराची योजना, जाणून घ्या सविस्तर
Jharkhand Political Crisis (संग्रहित संपादित प्रतिमा)

Jharkhand Political Crisis: बिहारनंतर आता झारखंडमध्ये (Jharkhand) राजकीय संकट उभे ठाकले आहे. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या अटकेनंतर राज्यात सरकार स्थापनेची चर्चा आणखी तीव्र झाली आहे. भाजप या प्रकरणी सक्रिय झाला आहे. भाजपने इतर राज्यांप्रमाणे इथेही फोडाफोडीचे राजकारण करू नये म्हणून झामुमो (JMM) आणि त्यांचे मित्र पक्ष आपापल्या आमदारांना फुटण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आमदारांचे हैद्राबाद येथे स्थलांतर करण्याची योजना आखण्यात आली आहे.

अशात आम्हाला पुरेशा आमदारांचा पाठिंबा असल्याने आम्हीच सरकार स्थापन करू, असा दावा नवीन होणारे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी केला आहे. काल हेमंत सोरेन यांनी झारखंड मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतल्यानंतर चंपाई सोरेन यांनी सरकार स्थापनेचा प्रस्ताव मांडला. चंपाई सोरेन यांनी 47 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन राजभवन गाठले आणि सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र, अजूनपर्यंत त्यांना शपथ घेण्यासाठी वेळ मिळालेला नाही. यावर झामुमो-काँग्रेस प्रश्न उपस्थित करत आहेत. अशात खबरदारीचा उपाय म्हणून आमदारांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.

सत्ताधारी पक्षाने आपल्या आमदारांना हैदराबादला हलवण्याची योजना आखली आहे. बिरसा मुंडा विमानतळावरून सुमारे 35 आमदारांना चार्टर्ड विमानाने हैदराबादला नेण्यात येण्यात होते. सकाळीच हेलिकॉप्टर बोलावण्यात आले होते. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी आघाडीचे सुमारे 35 आमदार गुरुवारी रांचीहून काँग्रेसशासित तेलंगणात जाण्यासाठी विमानात चढले मात्र, कमी दृश्यमानतेमुळे त्यांचे फ्लाइट टेक ऑफ होऊ शकले नाही. झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा असून, यामध्ये युतीचे 49 आमदार आहेत. युतीमध्ये जेएमएमचे 29, काँग्रेसचे 17 आणि एनसीपी, आरजेडी आणि डावे यांचे प्रत्येकी एक आमदार आहेत.

जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. या अटकेविरोधात हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड उद्या सुनावणी करणार आहेत. त्याचवेळी हेमंत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. हेमंत सोरेन यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 10 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती, मात्र आदेश राखून ठेवण्यात आला असून पुढील सुनावणी उद्या होणार आहे. (हेही वाचा: Jharkhand New CM: हेमंत सोरेन देणार पदाचा राजीनामा; Champai Soren असणार झारखंडचे नवीन मुख्यमंत्री)

दरम्यान, जमीन घोटाळ्यात ईडीच्या कारवाईमुळे नाराज झालेले हेमंत सोरेन यांनी ईडीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यांच्या वतीने एसटीएससी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.  अंमलबजावणी संचालनालय कथित जमीन घोटाळ्याची चौकशी करत आहे. हेमंत सोरेन यांच्यावरही मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना ईडीने हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील घरावर 29 जानेवारी रोजी छापा टाकला होता. यावेळी सुमारे 36 लाख रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली.