जालोर: प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांचा नागीण डान्स; शिक्षण विभागाने कठोर कारवाई करत केले निलंबित (Video)
शिक्षकांचा नागीण डान्स (Photo Crdit : Youtube)

राजस्थानच्या जालोरमधील (Jalore) सायना ब्लॉकमध्ये, पाच दिवसांच्या अनिवासी शिक्षक प्रशिक्षण शिबिरादरम्यानची एक धक्कादायक घटना समोर येत आहे. या शिबिरामध्ये सहभागी झालेले शिक्षक आणि शिक्षिका यांनी हिंदी गाण्यावर बेभान नृत्य केले. इतकेच नाही तर या सर्वांनी एकत्र मिळून चक्क नागीण डान्स (Nagin Dance) केला. या गोष्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासंदर्भात ही बाब जिल्हा शिक्षणाधिकारी (जालोर) यांच्याकडे गेली असता, त्यांनी सहसंचालक शिक्षण विभागाला व्हिडिओविषयी माहिती दिली.

या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका आपल्या इतर दोन सहकाऱ्यांसोबत नागीण डान्स करताना दिसत आहे. ही बाब गांभीर्याने घेत शिक्षण विभागाने प्रशिक्षण शिबिराचे प्रभारी व बिशनगड शासकीय उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य यांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर इतर शिक्षकांचे अहवाल तयार करुन सादर करण्यास सांगितले आहे. ही घटना 10 दिवसांपूर्वी घडली होती, परंतु हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने त्यांच्यावर बुधवारी कारवाई केली. या घटनेच्या चौकशीची जबाबदारी जिल्हा शिक्षणाधिकारी राजेंद्रकुमार शर्मा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. चौकशीचा आदेश मिळाल्यानंतर डीईओ शर्मा यांनी त्यांच्या खालील अधिकाऱ्यांकडे तातडीने याचा अहवाल मागविला आहे. (हेही वाचा: स्वत:च्या लग्नात नागिन डान्स करणे नवरदेवाला पडले महागात)

यापैकी एका शिक्षकाला निलंबित केले असून, इतर दोघांना नोटीस पाठवली आहे. मात्र विभागातील इतर अनेक शिक्षकांनी या निलंबनाच्या आदेशावर आक्षेप घेतला आहे. 'हे शिक्षक आपल्या ब्रेक टाईममध्ये इतरांप्रमाणे फक्त आनंद घेत होते. यात अश्लील किंवा हानिकारक काय आहे? सरकारी कर्मचारी आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत चांगला वेळ घालवू शकत नाही? हे न्याय्य नाही,' असे मत एका शिक्षकाने व्यक्त केले आहे.