भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या नवीन योजनेच्या रूपात तेजस एक्सप्रेसच्या (Tejas Express) प्रवाशांसाठी लवकरच एक खुशखबर समोर येऊ शकते. यानुसार दिल्ली- लखनौ (Delhi- Lucknow) आणि मुंबई- अहमदाबाद (Mumbai- Ahemdabad) या मार्गावर तेजस एक्सप्रेस नव्याने सुरु होणार आहे. या गाड्यांच्या प्रवाशांसाठी तिकिटासोबतच हॉटेल बुकिंग, टॅक्सी व सामान उचलण्यासाठी कुली इतकेच नव्हे तर शारीरिक अपंग प्रवाशांसाठी व्हीलचेअरची सोय उपलब्ध करून देण्याचा IRCTC चा मानस आहे. याबाबत रेल्वे बोर्ड चेअरमन वी. के. यादव (V.K. Yadav) यांनी सोमवारी माहिती देत अशा प्रकारे प्रवाशांसाठी सुविधा देण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे सांगितले आहे.
प्राप्त माहितीनुसार,अनेक प्रगत देशांमध्ये रेल्वेची कामकाज हाताळण्यात खाजफी संस्थांना देखील समाविष्ट केले जाते. भारतात व्यावसायिक कंपनी देखील याच तत्वावर काम करतात. त्याचप्रमाणे आता रेल्वे मध्ये देखील खाजगी संस्थांना काही मार्गावर ट्रेन चालवण्याची मुभा देण्यात यावी असा आयआरसीटीसीचा विचार आहे. याबाबत सध्या चर्चा सुरु असून अनेकांनी यामध्ये स्वतः पुढाकार घेतला आहे. असे करताना ट्रेनच्या सुरक्षेसाठी गार्ड व लोकोमोटिव्ह (ट्रेनचालक) हे संपूर्णतः भारतीय रेल्वेच्या कामकाजाच्या परीक्षणाखाली असतील तर अन्य सर्व सुविधा या IRCTC अंतर्गत असणार आहेत.
दरम्यान, या दोन गाड्या पुढील महिन्यापासून सुरु होणार आहेत, सुरुवातीला हा कारभार तीन वर्षांच्या करारावर पार पडेल, ज्यासाठी अगोदरच ब्लूप्रिंट सह अन्य बाबींची तरतूद करण्यात येत आहे. शताब्दी एक्सप्रेसच्या बरोबरीने या दोन्ही ट्रेन धावणार आहेत.