beggars | Pixabay.com

देशातील सर्वात स्वच्छ शहरामध्ये 'इंदौर' (Indore) अव्वल स्थानी असलं तरीही या 'स्वच्छ इंदौर' मध्ये बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, सुपरमार्केट, मॉल्स आणि शहरातील ट्रॅफिक जंक्शनवर भीक मागताना बाळांना घेऊन जाणाऱ्या स्त्रिया देखील सर्रास दिसतात. ही स्थिती सुधारण्यासाठी आता इंदौर प्रशासनाने कंबर कसली आहे. आता रस्त्यावर भीक मागणार्‍या मुलांची माहिती देणार्‍याला प्रशासन 1000 रूपयांचे बक्षीस देणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एका महिलेने आपल्या मुलासह इंदौरच्या रस्त्यावर अवघ्या सहा आठवड्यांत भीक मागून 6 लाख रुपये कमावल्याच्या घटनेची माहिती समोर येताच हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर प्रशासनाने शहरातील लव-कुश स्क्वेअरजवळ भिकाऱ्याची आणि तिच्या 8 वर्षांच्या चिमुरडीची सुटका केली. Beggars Free India: आता 2026 पर्यंत अयोध्येसह देशातील 30 शहरे होणार 'भिकारी मुक्त'; सरकार राबवणार पुनर्वसन उपक्रम, जाणून घ्या सविस्तर .

सोमवारी, इंदौरचे कलेक्टर Asheesh Singh यांनी शहरातील भीक मागण्याच्या समस्येची ओळख पटवून त्यावर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतली. मुलांनी भीक मागण्याच्या घटनांची तक्रार करणाऱ्या नागरिकांना बक्षीस देण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

भीक मागणार्‍या मुलांची माहिती देणार्‍याला रोख रक्कमेचे बक्षीस दिले जाईल. ही माहिती व्हॉट्सअ‍ॅप नंबर 9691729017 वर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतची पोस्ट Indore Collector च्या X अकाऊंट वर आहे.

या सोबतच, शहरात एकापेक्षा जास्त वेळा बाल भीक मागण्याची विश्वासार्ह माहिती देणाऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यात येईल. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चौकाचौकात लहान मुलांच्या भीक मागण्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. महिला व बाल विकास विभागाचे कर्मचारी लक्ष ठेवण्यासाठी AICTSL आणि पोलीस नियंत्रण कक्षात तैनात असतील. लहान मुलांची भीक मागण्याची कोणतीही घटना पाहिल्यावर, ते त्वरित बचाव पथकाला कळवतील, जे कारवाई करतील. दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुलांना भीक मागण्यास भाग पाडल्याप्रकरणी आतापर्यंत तीन दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले असून या मोहिमेअंतर्गत 17 मुलांची सुटका करण्यात आली आहे.