Indian Economy: 2021 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 11.5 टक्के होईल; चीनसह अनेक देशांना मागे टाकेल भारतीय अर्थव्यवस्था- IMF
GDP | Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीमुळे 2020 मध्ये भारताची आर्थिक परिस्थिती अतिशय ढासळली होती. आता कुठे आर्थिक घडामोडी सुरु झाल्यानंतर जम बसायला सुरुवात झाली आहे. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारतीय अर्थव्यवस्थेबाबत (Indian Economy) चांगले संकेत दिले आहेत. आयएमएफने म्हटले आहे की 2021-22 आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दुप्पट वाढ होईल. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की भारताचा विकास दर विक्रमी 11.5 टक्क्यांनी वाढेल. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या वेगाने आर्थिक प्रगती साधणारा भारत हा मोठा अर्थव्यवस्थेचा एकमेव देश असेल असे नाणेनिधीने म्हटले आहे.

त्याचबरोबर आयएमएफने असेही म्हटले आहे की, पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था चीनसह जगातील बड्या देशांच्या आर्थिक विकासाला मागे टाकेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या ताज्या जागतिक आर्थिक आऊटलुक अहवालात ही माहिती दिली आहे. कोविड-19 साथीच्या आजारामुळे चालू आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेत 8 टक्के घट होणार असल्याचा अंदाजही अहवालात मांडला आहे. आयएमएफने जाहीर केलेल्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होण्याचा अंदाज आहे. वर्ष 2021 मध्ये आयएमएफने यूएस साठी 5.1, जपानसाठी 3.1, युकेसाठी 4.5, चीन 8.1, रशियासाठी 3.0, सौदी अरबसाठी 2.6 टक्के, स्पेन 5.9 टक्के आणि फ्रान्ससाठी 5.5 जीडीपी ग्रोथचा अंदाज व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंगळवारी सांगितले की, भारत सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक मानला जाऊ शकतो. कोरोना लस संदर्भात गेल्या तीन महिन्यांत काही देशांमध्ये काही अनपेक्षित यश मिळाले आहे. त्याचबरोबर काही देशांनी लसीकरण कार्यक्रमही सुरू केले आहेत. म्हणूनच अनेक देशांनी त्यांच्या आर्थिक घडामोडींना वेग आणला आहे. जागतिक अर्थव्यवस्था 2021 साठी आयएमएफचा अंदाज 5.5 टक्के आहे, ऑक्टोबर 2020 च्या अंदाजापेक्षा तो 0.3 टक्के जास्त आहे.

दरम्यान, याआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कोरोना विषाणू साथीची परिस्थिती आणि त्यातून उद्भवणारी आर्थिक आव्हाने हाताळल्याबद्दल भारताचे कौतुक केले होते. आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जियावा यांनी म्हटले होते की, साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी भारताने 'अत्यंत धाडसी' पावले उचलली आहेत.