हैदराबादच्या (Hyderabad) माहिती आणि तंत्रज्ञान (IITH) या संस्थेने अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षण अभ्यासात भारतीयांच्या मेंदूचा आकार हा पाश्चिमात्य (Western Countries) आणि पूर्वेकडील देशांमधील (Eastern Countries) लोकांच्या मेंदूपेक्षा छोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे असा दावा समोर येत आहे. यापूर्वी भारतीयांच्या मेंदूचा अशा प्रकारचा अॅटलास (Atlas) तयार करण्यात आला नव्हता असाही संस्थेचा दावा आहे. या संशोधनानुसार, भारतीय मेंदूची तुलना पाश्चिमात्य मेंदूशी केल्यास तुलनेने भारतीय मेंदू उंची, रुंदी आणि आकाराने छोटा आहे. अल्झायमर आणि इतर मेंदूच्या आजाराचे निदान करण्याच्या दृष्टीनेहे संशोधन करण्यात आले होते. हे संशोधन रिसर्च न्यूरॉलॉजी इंडिया (Research Neurology India) नावाच्या मेडिकल जनरलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, मेंदूचे आजार याविषयी अभ्यास करण्याचा हेतूने मॉन्ट्रियल न्यूरोलॉजीकल इन्टीट्यूट (MNI) टेम्प्लेटचा उपयोग मानकाच्या रुपात केला जातो, अशी सेंटर फॉर व्हिज्युअल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जयंत सिवास्वामी यांनी माहिती दिली आहे. संशोधकांनुसार, हे टेम्प्लेट कोकेशियान मेंदू नजरेपढे ठेवून विकसित करण्यात आले आहे मात्र हे टेम्प्लेट भारतीय लोकांच्या मेंदूशी संबंधित आजारांच्या तपासणीसाठी आदर्श पद्धत नाही, असे संशोधकांना वाटते.भारतीय लोकांच्या मेंदूचा आकार पाश्चिमात्या लोकांच्या मेंदूच्या आकारापेक्षा लहान असल्याचा निकष काढताना संस्थेतर्फे विविध स्कॅनचे निरीक्षणकरण्यात आले होते.
दरम्यान भारतीयांच्या मेंदूचे आकार यावरील निकषा शिवाय या सर्वेक्षणातून आणखीन एक गोष्ट स्पष्ट झाली आणि ती म्हणजे मेंदूची रचना आणि संबंधित आजारांचा अभ्यास करण्यासाठी एका सर्वसमावेशक अॅटलासची आवश्यकता आहे. या साठी विविध आकाराच्या मेंदूंवर ही चाचणी होणे गरजेचे आहे. खास भारतीय मेंदूसाठी उपयुक्त असे टेम्प्लेट यापूर्वी कधीही विकसित करण्यात आलेले नव्हते, पण हे सर्वेक्षण या अभ्यासातील एक पुढचे पाऊल आहे.