India Bans All Imports From Pakistan प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Edited Image)

India Bans All Imports From Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) एकामागून एक कठोर पावले उचलत आहे. आता भारताने पाकिस्तानमधून होणारी आयात पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय (India Bans All Imports From Pakistan) घेतला आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला आर्थिक फटका बसणार आहे. आयातीवरील बंदीमुळे पाकिस्तानी व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. या निर्णयामुळे आधीच कर्ज, महागाई आणि बेरोजगारीशी झुंजणाऱ्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिकट होईल.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शनिवारी याबाबत अधिसूचना जारी केली. यात म्हटलं आहे की, भारताने पाकिस्तानमधून सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की, परराष्ट्र व्यापार धोरण (FTP) 2023 मध्ये एक नवीन तरतूद जोडण्यात आली आहे, जी त्वरित लागू केली जाईल. वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले की आयातीसाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असेल. (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील जवळजवळ 50 पर्यटनस्थळे बंद; पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय)

पाकिस्तानमध्ये उद्भवणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात, मग ती मुक्तपणे आयात करता येण्याजोगी असो किंवा अन्यथा परवानगी असो, पुढील आदेश येईपर्यंत तात्काळ प्रतिबंधित असेल, असंही अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. या निर्बंधातील कोणत्याही अपवादासाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल. (हेही वाचा: Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराची दहशतवादविरोधी मोहीम सुरू; काही भागात इंटरनेट सेवा बंद)

भारतातून पाकिस्तानला निर्यात होणाऱ्या वस्तू -

भारतातून पाकिस्तानला निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या यादीत प्रामुख्याने कापूस, रसायने, अन्न उत्पादने, औषधे आणि मसाले यांचा समावेश आहे. याशिवाय, चहा, कॉफी, रंग, कांदा, टोमॅटो, लोखंड, स्टील, साखर, मीठ आणि ऑटो पार्ट्स यासारख्या वस्तू देखील भारतातून तिसऱ्या देशांमार्फत पाकिस्तानला जात आहेत.

पाकिस्तानातून भारतात आयात होणाऱ्या वस्तू -

पाकिस्तानातून भारतात 2019 पर्यंत सिमेंट, जिप्सम, फळे, तांबे आणि मीठ यांसारखी उत्पादने येत असत. पण, त्यानंतर सैंधव मीठ आणि मुलतानी माती यासारख्या वस्तूंचीचं आयात करण्यात येत होती. आता त्यावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.