StartUp | PC: Pixabay.com

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) 75,000 हून अधिक नवउद्यमांना (स्टार्टअप्सना) मान्यता दिली आहे. हा एक मैलाचा टप्पा असून स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना हा विशेष योग जुळून आला आहे;  अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग व्यवहार, अन्‍न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज जाहीर केली.  भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, भारतीय स्टार्टअप परिसंस्था नवोन्मेष, उत्साह आणि उद्योजकतेने भारलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2015 रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणादरम्यान, देशातील  लोकांच्या उद्योजकीय क्षमतांचा पुरेपुर उपयोग करणाऱ्या एका नवीन भारताची संकल्पना मांडली होती. त्यानंतरच्‍याच वर्षी म्हणजे 16 जानेवारी 2016 रोजी , देशात नवोन्मेष आणि नवउद्यमांना पाठबळ देण्यासाठी  एक मजबूत परिसंस्था तयार करण्याकरता, कृती आराखडा तयार करण्यासाठी एक कार्यक्रम सुरू करण्यात आला. आता 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून घोषित झाला आहे.   6 वर्षांनंतर, या कृती आराखड्याने भारताला तिसरी सर्वात मोठी परिसंस्था बनवण्यासाठी यशस्वीरित्या मार्गदर्शन केले आहे.  सुरुवातीच्या दहा हजार स्टार्टअप्सना 808  दिवसांत मान्यता मिळाली होती, तर पुढील दहा हजार स्टार्ट अप्सना केवळ 156 दिवसांत मान्यता मिळाली. सध्या दररोज 80 पेक्षा जास्त स्टार्टअप्सना मान्यता मिळत आहे . हा  जगातील सर्वोच्च दर असून भारतातील स्टार्टअप संस्कृतीचे भविष्य खूपच आशादायी आणि उत्साहवर्धक आहे.

स्टार्टअप इंडिया कार्यक्रम प्रामुख्याने स्टार्टअपसाठी सक्षम वातावरण प्रदान करण्यासाठी तयार केला होता. तो  आज स्टार्टअपसाठी एक संधी देणारे व्यासपीठ म्हणून विकसित झाले आहे. निधी पुरवण्यापासून ते कर प्रोत्साहनापर्यंत, बौद्धिक संपदा अधिकारांच्या पाठबळापासून सार्वजनिक खरेदी सुलभ करण्यापर्यंत, नियामक सुधारणा सक्षम करण्यापासून ते आंतरराष्ट्रीय महोत्सव आणि कार्यक्रमांमध्ये प्रवेश करण्यापर्यंत, स्टार्टअप इंडिया कार्यक्रम शाश्वत आर्थिक वाढीचा समानार्थी शब्द बनला आहे.

एकूण मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपैकी, सुमारे 12% आयटी सेवा, 9% आरोग्य सेवा आणि जीवन विज्ञान, 7% शिक्षण, 5% व्यावसायिक सेवा आणि 5% कृषी सेवा पुरवतात. भारतीय स्टार्टअप परिसंस्थेने आतापर्यंत 7.46 लाख रोजगार निर्माण केले आहेत. यात गेल्या 6 वर्षांमध्ये 110% वार्षिक वाढ झाली आहे.  आज आपले सुमारे 49% स्टार्टअप दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधील आहेत.  ही वस्तुस्थिती आपल्या देशातील तरुणांच्या प्रचंड क्षमतेवर शिक्कामोर्तब करणारी आहे.