जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकृत संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते 28 ऑगस्ट रोजी लोकार्पण
PM Narendra Modi (Photo Credits-File Image)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते येत्या 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:25 वाजता जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकृत संकुलाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण होणार आहे. ते यावेळी, स्मारकात बांधण्यात आलेल्या वस्तूसंग्रहालय दीर्घेचे उद्‌घाटन देखील करतील. यावेळी संकुल अद्ययावत करण्यासाठी सरकारने राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली जाईल.(e-Shram Portal: असंघटित कामगारांसाठी 'ई -श्रम' पोर्टल लॉन्च, केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अनावरण अनावरण)

सरकारने पूर्ण केलेले उपक्रम:

वापरात नसलेल्या आणि कमी वापर असलेल्या चार इमारतींचा पुनर्वापर करून ही दीर्घा बनविण्यात आले आहेत. या ठिकाणी दृकश्राव्य तंत्रज्ञान, प्रोजेक्शन मॅपिंग, त्रिमिती सादरीकरण तसेच कला आणि शिल्प उभारून, त्या काळात पंजाबमध्ये घडलेल्या ऐतिहासिक महत्वाच्या घटनांचे सादरीकरण केले जाईल.

13 एप्रिल 1919 रोजी घडलेल्या घटनांची प्रत्ययकारी माहिती देण्यासाठी, एक 'साउंड अँड लाईट शो' तयार करण्यात आला आहे. या संकुलात विविध विकास कामेही करण्यात आली आहेत. पंजाबच्या स्थानिक स्थापत्य कलेशी सुसंगत अशा विस्तृत वारसास्थळाचे जतन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शताब्दी विहीरीची दुरुस्ती करण्यात आली असून, त्यावर एक नवीन संरचना करण्यात आली आहे. बागेचे मध्यवर्ती ठिकाण, अग्नी स्मारक, देखील दुरुस्त करून पुनर्स्थापित करण्यात आले आहे, इथले लिली सरोवर पुनरुज्जीवित करण्यात आले आहे तसेच पर्यटकांना चालण्यास अधिक सोपे जावे, यासाठी पायवाटा अधिक रुंद करण्यात आल्या आहेत.

योग्य मार्गदर्शिका आणि चिन्ह फलक, विशिष्ट ठिकाणी दिवे लावून स्थानिक जातीची झाडे लावून सुशोभीकरण, संपूर्ण बगिच्यात संगीत या सारख्या नव्या आणि अत्याधुनिक सोयी निर्माण करण्यात आल्या आहेत. तसेच मुक्ती मैदान, अमर ज्योती आणि ध्वज स्तंभ यासाठी नवे भाग विकसित करण्यात आले आहेत.(Aadhaar Card Update: आधार कार्ड बाबत UIDAI ने वेबसाईट वरून बंद केल्या 'या' दोन सुविधा; इथे पहा अधिक माहिती)

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री, केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री, पंजाबचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, हरियाणा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री, पंजाबचे सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदार, जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक न्यासाचे सभासद, या वेळी उपस्थित राहतील.