देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) संकटांमुळे गेले दीड वर्षे लोक त्यांच्या घरातच कैद आहेत. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. या दरम्यान लोक स्ट्रीट फूडचा किंवा रेस्टॉरंटमधील अन्नाचा आनंद घेणे मिस करत आहेत. आता पुन्हा स्ट्रीट फूडबाबत पूर्वीचे वातावरण लोकांना देण्यासाठी केरळ (Kerala) पर्यटन मंत्रालयाने एक खास पाऊल उचलले आहे. मंत्रालय राज्यात कार-डायनिंग (In-Car Dining) सुविधा सुरू करणार आहे. याअंतर्गत पर्यटकांना त्यांच्या वाहनांतच भोजन दिले जाणार आहे. अशाप्रकारे लोक घराबाहेर पडून सामाजिक अंतराचे पालन करून खाण्यापिण्याचा आनंद घेऊ शकतील. यासह पर्यटन व्यवसायालाही यातून फायदा होईल असा मंत्रालयाचा विश्वास आहे.
सार्वजनिक ठिकाणी जेवणाचा आनंद घेताना अजूनही कोरोना संक्रमणाचा धोका आहे, ही बाब लक्षात घेऊन सरकार लोकांच्या कारमध्येच अन्नपदार्थ पुरवणार आहे. केरळ पर्यटनमंत्री पी.ए. मोहम्मद रियास यांच्या म्हणण्यानुसार या उपक्रमांतर्गत ग्राहक त्यांच्या वाहनात बसून केटीडीसीच्या रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर देऊ शकतील आणि त्यांच्या वाहनातच त्यांना ऑर्डर मिळेल. 'इन-कार डायनिंग' अंतर्गत मेन्यूमध्ये न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि स्नॅक्स समाविष्ट असेल. ही योजना केवळ निवडक केटीडीसी रेस्टॉरंट्समध्येच राबविली जाईल.
मंत्री म्हणाले की 'इन-कार डायनिंग' योजना आमच्या ग्राहकांना नवीन अनुभव देण्याचा प्रयत्न करेल. लोकांना सुरक्षित आणि चवदार अन्न पुरविणे हे त्याचे उद्दीष्ट आहे. (हेही वाचा: Coronavirus महामारीची दुसरी लाट उताराला, भारतात 81 दिवसांमध्ये सर्वाधिक कमी रुग्णांची नोंद, पाठिमागील 24 तासात 58,419 जणांना संक्रमण)
दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, राज्यात कोविड-19 प्रकरणांमध्ये 42 टक्के घट झाली आहे. मात्र त्यांनी व्हायरसच्या अति संक्रामक डेल्टा प्रकाराबाबत लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. दरम्यान, शनिवारी केरळमध्ये कोविड-19 ची 12,443 प्रकरणे समोर आली, यासह राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 27,97,747 झाली आहे.