Photo Credit- X

Triple Talaq On Video Call in Mumbai: तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही काही जण त्याचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे. नवी मुंबईतून अशीच एक ताजी घचना समोर आली आहे. एका महिलेने तिचा नवरा आणि सासरच्यांविरुद्ध हुंड्यासाठी छळ(Dowry Harassment) आणि व्हिडिओ कॉलवरून तिहेरी तलाकचा (Triple Talaq) आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) विधेयकांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सीवूड्स येथील रहिवासी असलेल्या पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ब्रिटनमध्ये काम करणारा तिचा नवरा आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ केला आणि व्हिडिओ कॉलवर तिहेरी तलाक दिल्याचा आरोप तिने केला आहे.

लग्न 2022 मध्ये झाले

महिलेचे म्हणणे आहे की, 2022 मध्ये मुस्लिम रितीरिवाजांनुसार आकिब भाटीवालासोबत तिचा विवाह झाला होता. सुरुवातीला सर्व काही ठीक होते. मात्र, ती वडाळ्यात सासरच्यांकडे राहायला गेल्यावर छळ सुरू झाला. इतकंच नाही तर ती पती आणि सासरच्या मंडळींसोबत ब्रिटनला गेल्यावर प्रकरण वाढलं, तिथेही तिच्यावर अत्याचार करण्यात आले.

दाखल तक्रारीनुसार महिलेचा आरोप केला आहे की, ब्रिटनमध्ये असताना घरगुती वादादरम्यान तिच्या पतीने तिचे दागिने हिसकावले आणि तिला भारतात परत पाठवले. त्यानंतर आकिबने तिच्यासोबतचे संभाषण थांबवले. त्यानंतर काही दिवसातच व्हिडिओ कॉलवर तिहेरी तलाक दिला. महिलेचे म्हणणे आहे की, जेव्हा ती पुन्हा ब्रिटनला परतली तेव्हा तिला घरात प्रवेश दिला गेला नाही. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

तिहेरी तलाक हा गुन्हा

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ऑगस्ट 2017 मध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकला संविधानाच्या विरोधात ठरवत मनमानी असल्याचे घोषित केले होते. 2019 मध्ये, संसदेने मुस्लिम महिला (विवाहावरील हक्कांचे संरक्षण) कायदा संमत केला. ज्यामुळे तिहेरी तलाक हा गुन्हा तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.