HIV Infection From Tattoo: टॅटू गोंदवला आणि एचआयव्ही झाला,  उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील घटना
Tattoo Design | Edited Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

वाराणसी (Varanasi) येथील एखा घटनेने अवघे उत्तर प्रदेश आणि काही प्रमाणात देशातही खळबळ उडाली आहे. ही खळबळ उडण्याचे कारण असे की, 14 जणांनी आपल्या अंगावर टॅटू गोंदवला (Tattoo Design). त्यांची ही फॅशन (Fashion) त्यांना महागात पडली आहे. ज्यामुळे त्यांना एचआयव्ही (HIV) या विषाणूची लागण झाली आहे. होय, डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय चाचणीमध्ये ही धक्कादायक बाब पुढे आली आहे. सांगितले जात आहे की, या 14 जणांनी एकाच ठिकाणाहून टॅटू गोदवून घेतला होता. ज्या व्यक्तीने त्यांना टॅटू गोंदवला त्याने निष्काळजीपणे एकच सूई सर्वांचे टॅटू काढताना वापरली होती. अँटी रेट्रो व्हायरल ट्रीटमेंट सेंटरच्या डॉक्टरांनी ही माहिती दिली.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व लोकांनी नुकताच आपल्या शरीराव टॅटू गोंदवला होता. टॅटू गोंदवल्यानंर हे सर्व जण सुरुवातीला किरकोळ आजारी पडले. पुढे हे आजारपण वाढत गेले. त्यांना सर्दी,ताप, थंडी खोकला अशी लक्षणे दिसू लागली. त्यांनी वैद्यकीय उपचार केले. मात्र, कोणताच फरक पडत नव्हता. त्यांचे वजनही मोठ्या झपाट्याने कमी होत होते. डॉक्टरांनी त्यांची रक्ततपासणी केली असता त्यांना एचआयव्ही विषाणूची लागण झाल्याचे पुढे आले. एकाच वेळी इतक्या लोकांना आणि समान लक्षणांनी एचआयव्ही लागण झाल्याचे पुढेआल्याने डॉक्टरांनी अधिक चौकशी केली. (हेही वाचा, https://marathi.latestly.com/social-viral/the-50-year-old-model-has-tattoos-all-over-her-body-as-she-gets-bored-of-wearing-clothes-see-photos-370626.html)

अधिकच्या चौकशीत पुढे आले की, सर्वांनी एकाच ठिकाणी जाऊन टॅटू गोंदवले होते. हा टॅटू गोंदवताना कोणत्याही प्रकारे काळजी घेण्यात आली नव्हती. सूईसुद्धा बदलण्यात आली नव्हती. परिणामी एकाच वेळी सर्वांना ही लागण झाली.

तरुणाईमध्ये टॅटूची क्रेझ मोठी आहे. टॅटू हा एक फॅशनचा भाग मानला जातो. त्यामुळे आपल्याकडे अनेकांना टॅटू गोंदवणे आवडू लागले आहे. काही असले तरी अशा पद्धतीने टॅटू काढताना काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. थोडा जरी निष्काळजीपणा झाला तर काय घडू शकते हे वरच्या घटनेवरुन पुढे आलेच आहे. त्यामुळे केवळ ही घटना घडली म्हणूनच नव्हे तर टॅटू काढताना नेहमीच काळजी घ्यायला हवी.